उन्हाळ्यात वाढत्या तापमानात शरीराची काळजी घेणे आवश्यक असते. अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यत वाढत्या उष्णतेच्या समस्येमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाश, त्यामुळे होणारे डिहाड्रेशन आणि बदलत राहणारे हवामान यामुळे लहान मुले वारंवार आजारी पडू शकतात. अशा परिस्थितीत लहान मुलांना विविध संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणे आवश्यक असते. आहाराच्या माध्यमातून लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. आज आपण जाणून घेऊयात, मुलांना उन्हाळ्यात निरोगी ठेवण्यासाठी आहार कसा द्यावा? कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
उन्हाळ्यात होणारे डिहाड्रेशन हे बहुधा सर्व आजाराचे मूळ असू शकते. त्यामुळे तुमचे मूल पुरेसे पाणी पित आहे का नाही? याकडे लक्ष द्यावे. मुलांना बाहेर पाठवताना पाण्याची बाटली सोबत द्यावी कारण शरीरात पाणी राहिल्याने तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अनेक हंगामी फळे बाजारात येतात. उष्णतेपासून शरीराला दिलासा मिळण्यासाठी तुम्ही हंगामी फळे आणि त्याचा रस मुलांना द्यायला हवा. टरबूज, द्राक्षे, संत्री, लिची शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय यातील पोषक घटक जसे की, व्हिटॅमिन सी आणि ऍटी-ऑक्सिडंट्स मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी मुलांच्या आहारात दुधी भोपळा, काकडी, भोपळा यासारख्या भाज्यांचा समावेश करावा. या भाज्या पचण्यास हलक्या असतात शिवाय यात भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन असतात.
मुलांच्या आहारात या दिवसात दही आणि ताक यांचा समावेश अवश्य करावा. यातील प्रोबायोटिक्स आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देतात, ज्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत मिळते.
मुलांना सतत लिंबू पाणी, नारळ पाणी पिण्यास सांगावे. नारळ पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स आणि लिंबू पाण्यातील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.
हेही पाहा –