मराठमोळा अभिनेता किरण गायकवाडला 'देवमाणूस' मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या मालिकेचा थरारक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये किरण गायकवाडचे भयानक रुप पाहायला मिळत आहे. प्रोमो मालिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
'झी मराठी'ने 'देवमाणूस' मालिकेचा हटके प्रोमो शेअर करून त्याला जबरदस्त कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "भल्याभल्यांची झोप उडवायला, देवमाणूस येतोय 'माप' घ्यायला..." या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'हिम्मतराव लेडीज टेलर' बाहेर महिलांची कपडे शिवण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच महिला टेलरची म्हणजेच 'देवमाणूस' चे कौतुक करत आहेत.
'देवमाणूस' एका नव्या गावात टेलर बनून येतो. तो येथे 'हिम्मतराव लेडीज टेलर' नावाने टेलरिंगचे दुकान चालवत आहे. आपल्या शिवण कौशल्याने त्याने महिलांना वेड लावले आहे. त्याच्या दुकानाबाहेर महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र 'देवमाणूस' च्या डोळ्यात एक वेगळीच आग पाहायला मिळत आहे. प्रोमोमधील 'देवमाणूस' म्हणतो की, "मी बाईचे कपडे शिवतो, मी बाईला शिवत नाही...पाप लागेल मला परक्या बाईकडे असं वाकड्या नजरेनं बघितलं तर...तो वरचा सगळं बघतोय..."
प्रोमोच्या शेवटी कपाटावर एका महिलेचा मृतदेह पाहायला मिळतो. अशा थरारक प्रोमोने प्रेक्षकांची झोप उडवली आहे. हा 'देवमाणूस' मालिकेचा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. मालिकेतील 'देवमाणूस' म्हणजे किरण गायकवाडने आपल्या भूमिकेने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे.