ब्रँडेड की लोकल कूलर? निर्णय घेण्याआधी हे नक्की वाचा!
GH News May 05, 2025 07:09 PM

उन्हाळा कहर करतोय आणि घरात गारवा हवा असेल तर कूलर हाच पर्याय अनेक जण निवडतात. मात्र, मार्केटमध्ये ‘लोकल कूलर’च्या झगमगाटात अनेकजण ब्रँडेड कूलरपासून दूर राहतात. स्वस्तात मस्त वाटणारे हे कूलर प्रत्यक्षात तुमचं जास्त नुकसान करू शकतात. त्यामुळे खरेदी करताना थोडी शहाणपणाची गरज आहे. ब्रँडेड आणि लोकल कूलरमध्ये नेमका फरक काय? कुणाचा परफॉर्मन्स चांगला आणि दीर्घकालीन फायदा कुठे आहे? चला जाणून घेऊया.

लोकल कूलर :

लोकल कूलर सहजपणे कमी किंमतीत मिळतो. वेगवेगळ्या डिझाइनमध्ये, आकर्षक रंगांमध्ये हा बाजारात खरेदीसाठी उपलब्ध असतो. पण स्वस्त म्हणजे चांगला असा समज चुकीचा ठरू शकतो. हे कूलर बहुतेक वेळा स्थानिक कारागिरांकडून बनवलेले असतात, त्यात स्टँडर्ड मोटर, फायबर किंवा लो क्वालिटी प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे यांचे आयुष्य कमी असते. यात वॉरंटी किंवा विक्री पश्चात सेवा (after sales service) फारशी दिली जात नाही. बिघाड झाल्यास नवा कूलर घ्यावा लागतो.

ब्रँडेड कूलर :

ब्रँडेड कंपन्यांचे कूलर हे ISI प्रमाणित आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या निकषांनुसार तयार केले जातात. त्यांच्या शरीराची रचना मजबूत असते, आणि पंख्याच्या ब्लेडपासून मोटरपर्यंत दर्जेदार मटेरियलचा वापर होतो. त्यात Honeycomb Pads, डस्ट फिल्टर, एअर थ्रो रेंज, वेगवेगळे फॅन स्पीड असे फीचर्स असतात. शिवाय, अनेक ब्रँड्स 1-2 वर्षांची वॉरंटी देतात आणि सर्व्हिस सेंटर्सही देशभरात उपलब्ध असतात. यामुळे दीर्घकाळासाठी त्यांचा परफॉर्मन्स समाधानकारक असतो.

वीज बिलाचा हिशोब :

लोकल कूलरमध्ये साधारणतः एनर्जी सेव्हिंगचा विचार केला जात नाही. त्यात वापरली जाणारी मोटर अधिक वीज खर्च करते. ब्रँडेड कूलर मात्र BEE रेटिंग असलेले असतात, जे विजेची बचत करतात. म्हणजेच दीर्घकालीन वापरात ब्रँडेड कूलरच जास्त फायदेशीर ठरतो.

डिझाईन आणि सेफ्टीही महत्वाची :

लोकल कूलरचे डिझाईन जरी आकर्षक वाटले तरी ते कधीकधी धोकादायक ठरू शकते. वायरिंग, इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि पाण्याचा योग्य निचरा या बाबतीत ब्रँडेड कूलर अधिक विश्वासार्ह असतात. खासकरून लहान मुले आणि वयोवृद्ध असलेल्या घरांमध्ये सेफ्टी ही प्राथमिकता असावी.

तर काय निवडाल?

जर तुम्ही काही महिनेच वापरणार असाल आणि बजेट कमी असेल, तर लोकल कूलर तात्पुरता पर्याय होऊ शकतो. पण दीर्घकाळासाठी, सुरक्षितता, सेवा आणि गुणवत्ता पाहायची असेल तर ब्रँडेड कूलरच उत्तम ठरतो. थोडेसे जास्त पैसे देऊन नंतरची डोकेदुखी टाळणं जास्त शहाणपणाचं!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.