सोमवारी (५ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय सामन्यावर हा सामना होत आहे.
आधीच या स्पर्धेत संघर्ष करत असलेल्या हैदराबाद संघाने या सामन्यात मात्र शानदार गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्यांची संघमालकीण काव्या मारन देखील पहिल्या डावात खूश दिसली. दरम्यान, एका धावबादवेळी तिची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. हा निर्णय त्याने सुरुवातीला योग्यही ठरवला. कमिन्सने पहिल्या ५ षटकातच करुण नायर, फाफ डू प्लेसिस आणि अभिषेक पोरेल या तिघांना बाद केले. त्यानंतर हर्षल पटेलने अक्षर पटेलला ६ धावांवर आणि जयदेव उनाडकटने केएल राहुलला १० धावांवर बाद केले. त्यामुळे ७.१ षटकात ५ बाद २९ धावा अशी दिल्लीची अवस्था झाली होती.
पण नंतर ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी डाव सावरत संघाला ६० धावा पार करून दिल्या. हे दोघे डाव पुढे नेत होते. पण १३ व्या षटकात झिशान अन्सारी गोलंदाजी करत होता. यावेळी स्टब्सने शॉट खेळला आणि त्याने विपराज निगमसोबत पहिली धाव पूर्ण केली.
त्यानंतर स्टब्स दुसऱ्या धावेसाठीही धावला, पण विपराजने पाहिलं नाही. स्टब्स दुसऱ्या धावेसाठी पळत स्ट्रायकर एन्डलाही पोहचला होता. पण विपराज नाही म्हणत होता आणि तो पळालाच नाही. त्यामुळे दोन्ही फलंदाज स्ट्रायकर एन्डला होते. अखेर नॉनस्ट्राकरवरील स्टंपवरील बेल्स झिशानने उडवले. त्यामुळे विपराजला त्याच्या विकेटचा त्याग करावा लागला. तो १७ चेंडूत १८ धावा करून परतला.
तो जेव्हा धावबाद होत होता, त्यावेळी स्टेडियममध्ये असलेली काव्या मारन उत्साहाने 'इकडे इकडे मार' अशा अर्थाचे हाताने इशारे करत होती. त्यानंतर विपराज बाद झाल्याचे पाहताच ती खूशही झाल्याचे दिसले. तिच्या रिअॅक्शनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, विपराज बाद झाल्यानंतरही स्टब्सने आशुतोष शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे संघाला १०० धावा पार करता आल्या. आशुतोष २६ चेंडूत ४१ धावा करून शेवटच्या षटकात बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने डावाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत २० षटाकात दिल्लीला ७ बाद १३३ धावांपर्यंत पोहचवले. ट्रिस्टन स्टब्स ३६ चेंडूत ४१ धावांवर नाबाद राहिला.
हैदराबादकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.