पराक्रमी पूर्वजांचा वारसा लाभणे ही अतिशय भाग्याची गोष्ट असते आणि तो वारसा टिकवणे हे तितकेच कष्टाचे असते. पाटणकर घराणे हे असाच वैभवशाली वारसा लाभलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन घराणे आहे. ज्यांचा संबंध चालुक्यांशी जोडला जातो. आदिलशाहीत पाटण गावची जहागीर मिळाल्याने मूळ आडनाव साळुंखे असणाऱ्या या घराण्याला पाटणकर हे उपनाम मिळाले.
साळुंखे घराण्याचे मूळ हे गुजरातमधील. ९४२ ते ९९७ अशी प्रदीर्घ कारकीर्द असणारा मूळराज हा गुजरातवर राज्य करणाऱ्या चालुक्य वंशातील एक कर्तबगार पुरुष होता. पुढे हे घराणे महाराष्ट्रात आले आणि वेगवेगळ्या सत्ताधीशांच्या कालखंडात अंगभूत कर्तृत्वाने सदैव झळकत राहिले.
आदिलशाही दरबारात मोठमोठ्या कामगिऱ्या पार पाडल्याने जोत्याजीराव साळुंखे यांना पाटणची जहागीर मिळाली. त्यांच्या पुढील तीनचार पिढ्या आदिलशाहीच्या सेवेत गेल्यानंतर शिवछत्रपतींच्या रूपाने हिंदवी स्वराज्याचा उदय झाला आणि पाटणकर घराणे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले आणि विश्वासू बनले.
ब्रिटिश आमदानीत रामचंद्रराव पाटणकर यांचा विवाह १८४६ मध्ये करवीर छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराज यांच्या कन्या आऊबाईसाहेबांशी झाला आणि १८५० मध्ये त्यांना नागोजीराव हा पुत्र झाला. पण लवकरच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने नागोजीराव हे कोल्हापूरला आपले मामा छत्रपती शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांच्यासोबत राहू लागले.
बाबासाहेब महाराजांच्या अंतकाळी गादीला वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांनी १ ऑगस्ट १८६६ मध्ये नागोजीराव पाटणकर यांना दत्तक घेतले आणि राजाराम महाराज हे नाव देऊन त्यांना करवीर गादीचे पुढील छत्रपती म्हणून घोषित केले.
त्यांचे चरित्र लिहिणे हे खरं तर एक मोठे आव्हानच होते कारण महाराजांची अल्प कारकीर्द, चरित्रासाठी पुरेसे दस्तऐवज उपलब्ध नसणे अशा उणिवांवर मात करत डॉ. इस्माईल पठाण यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे.
करवीर छत्रपती घराण्याची पूर्वपीठिका या भागात करवीर गादीवर आलेले सर्व छत्रपती, त्यांची कारकीर्द, आव्हाने यांची माहिती वाचकांना मिळते. इथून पुढे मात्र अभ्यासकांनाही माहीत नसणारा प्रवास सुरू होतो. पाटणकर घराण्यातील कर्ते पुरुष, त्यांनी गाजवलेली समरांगणे आणि मुस्लीम सत्ताधीशांच्या सेवेपासून ते छत्रपतींच्या सेवेत असताना पार पडलेल्या कामगिऱ्या यांचा आढावा यामध्ये घेतलेला आहे.
चरित्रनायक छत्रपती राजाराम महाराजांच्या दत्तकविधानापासून पुस्तकातले चौथे प्रकरण सुरू होते. दत्तक आले तेव्हा महाराजांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते. त्यामुळे ते सज्ञान होईपर्यंत कोल्हापूर संस्थानाचा कारभार ब्रिटिश प्रशासनातर्फेच चालवला जाणार होता आणि महाराजांना इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देण्याची जबाबदारीही ब्रिटिश प्रशासनाने कॅप्टन एडवर्ड वेस्ट या ब्रिटिश अधिकाऱ्यावर सोपवली.
त्यातून महाराज उत्तम इंग्लिश बोलू लागले, त्यांना जगाची, तत्कालीन घडामोडींची उत्तम माहिती तर झाली. राजाराम हायस्कूलच्या पायाभरणीप्रसंगी महाराज भाषण करताना म्हणाले होते,‘‘ शिक्षणाच्या प्रसाराने लोकांच्या जुन्या समजुती नाहीशा होतील व विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल.’
एक राजपुरुष वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षणाबाबत किती विचारी व जबाबदारीने वागत बोलत होते, समजून येते. राज्यकारभार करताना महाराजांना आपण परदेशप्रवास करून विविध देशांना भेटी द्याव्यात आणि जगाची माहिती करून घ्यावी अशी इच्छा झाली.
कोल्हापूरच्या जनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांची स्वप्नं पूर्ण करणारा, त्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारा हा राजा सत्तेवर आल्यानंतर राज्याची मोठी भरभराट करेल अशी त्यांची अपेक्षा होती. पण काही स्वप्नांना अपूर्णतेचा शाप असतो, तो यालाही होता.
इथून पुढील दोन प्रकरणे महाराजांनी सुरू केलेला युरोपच्या दिशेने प्रवास, त्यांनी भेट दिलेली ठिकाणे, जाणून घेतलेली माहिती, महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी आणि तिथेच अल्पशा आजाराने झालेला त्यांचा मृत्यू याबद्दल सविस्तर माहिती सांगतात.
महाराजांचा युरोपचा प्रवास आणि तेथील वास्तव्याची संपूर्ण माहिती देणारा सर्वांत मोठा स्रोत म्हणजे त्यांनी लिहिलेली डायरी. परदेशात असताना भेट दिलेली संग्रहालये, ग्रंथालये, विद्यापीठ, कारखाने, ब्रिटिश संसद अशा असंख्य ठिकाणांची आणि त्यांना भेटलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल त्यांनी तिच्यात नोंदवून ठेवलेलं आहे. ही डायरी त्यांच्या मृत्यूनंतर ‘‘ Diary of the late Rajah of Kolhapoor, during his visit to Europe in १८७० ’’ या नावाने प्रकाशित झालेली होती.
युरोपचा दौरा आटोपून भारतात परतताना फ्लॉरेन्स मुक्कामी महाराजांची प्रकृती पुरती ढासळली आणि ३० नोव्हेबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. तेथेचे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही अर्नो नदीकाठी त्यांचे स्मारक उभे आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या या चरित्रग्रंथाला त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तऐवज परिशिष्टरूपाने जोडलेले आहेत, त्यामुळे या चरित्रग्रंथाला संदर्भग्रंथाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
पुस्तकाचे नाव : छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे : १८६६ ते १८७०)
लेखक : डॉ. इस्माईल हुसेनसाहेब पठाण
प्रकाशक : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पृष्ठे : १९०
मूल्य : १५० रुपये.