निपाणी : अलीकडच्या काळात दहावी-बारावी'मध्ये चांगले गुण मिळावेत, यासाठी आई-वडील धडपडत आहेत. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग व इतर कामासाठी हजारो रुपये खर्च करत आहेत; पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या अंजलीला (Anjali Bhosale) कर्करोग (Cancer) झाला आहे. दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अंजलीला दहावीत असतानाच कर्करोग झाला, तरीही न डगमगता, घाबरता तिने परीक्षा देऊन तब्बल ९० टक्के गुण घेतले होते.
त्यानंतर उपचार सुरू असतानाच (12th Exam Results) दिल्यानंतर 'देवचंद कॉलेज'मध्ये (Devchand College Nipani) अंजली सुरेश भोसले हिला ७४.३३ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे तिने कर्करोगासारख्या महाभयंकर रोगावर मात करीत मिळविलेले यश निश्चितच कौतुकास पात्र आहे.
जिद्द आणि कठोर परिश्रमामुळे उत्तुंग यशदेवचंद महाविद्यालयामध्ये बारावी वर्गात शिकत असताना कॉलेजपेक्षा जास्त दिवस तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रहावे लागले. तिची शारीरिक परिस्थिती बरी नसतानाही केवळ जिद्द आणि कठोर परिश्रमामुळे तिने हे उत्तुंग यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशामध्ये तिचे आई-वडील, देवचंद कॉलेजच्या प्राचार्य जी. डी. इंगळे, प्राध्यापक आर. के. दिवाकर यांच्यासह अनेकांनी मनोधैर्य दिले आहे.
कर्करोगासारख्या भयंकर रोगाला झुंज देत तिने मिळविलेल्या या यशाबद्दल अंजलीचे आडी आणि निपाणी परिसरात कौतुक होत आहे. अंजलीच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिचे वडील कागल येथील ५ स्टार औद्योगिक वसाहतीमध्ये काम करीत आहेत. तर, आई घरी अथवा शेतकाम करीत आहे. गेल्या ३-४ वर्षांपासून अंजलीला कर्करोगाने घेरले आहे. तिच्यावर कोल्हापूरसह मोठ्या शहरातील अनेक रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत; पण गरीब परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिला महागड्या दवाखान्यात उपचार घेता आले नाहीत.
यामुळे जास्त काळ उपचार पुढे गेले, तरीही तिचे आई-वडील न खचता आपल्या मुलीच्या शिक्षणासह औषध उपचारासाठी अनेक सामाजिक, राजकीय नेत्यांसह विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने तिचे उपचार चालू ठेवले आहेत. बेळगाव येथील बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या सहकार्याने कर्नाटक सरकारकडून मुख्यमंत्री निधीतून तिला आर्थिक सहाय्य मिळाले आहे. सध्या अंजली ही बंगळुर येथे सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. तिच्या या धाडसाबद्दल आणि तिच्या बौध्दिक पात्रतेमुळे देवचंद महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकांनी तिला आर्थिक सहकार्य केले आहे. तसेच निपाणीतील 'लाईट हाऊस फाऊंडेशन' या सामजिक संस्थेने पुढाकार घेऊन तिला आर्थिक मदत केली आहे.
'दोन वर्षांपासून माझी मुलगी कर्करोगासारख्या भयंकर रोगाचा सामना करीत आहे. त्यासाठी आम्ही सर्वांची मदत घेऊन तिच्या शिक्षणासह औषधोपचार सुरू ठेवले आहेत. तिने मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही कुटुंबीय भारावून गेलो आहोत. आता पुढील शिक्षण घेण्यासाठी ती लवकरात लवकर बरी व्हावी, ही आमची इच्छा आहे.'
-सुरेश भोसले, अंजलीचे वडील, आडी (ता. निपाणी)