इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू असतानाच गुजरात टायटन्सला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. एप्रिलच्या सुरुवातीलाच प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा अचानक मायदेशी दक्षिण आफ्रिकेला परतला होता. त्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे त्याने सांगितले होते.
पण जवळपास महिन्याने रबाडाने यामागील कारणाचा खुलासा केला होता. त्याने सांगितले की तो अंमली पदार्थाच्या सेवन प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ बंदीची कारवाई झाली. त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले होते.
आता तो भारतात परत आला असून गुजरात संघात दाखल झाला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. अशात त्याचे संघात असणे महत्त्वाचे आहे. इतकेच नाही, तर जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यामुळे रबाडाचे पुनरागमन या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहे.
आता असे समोर आले आहे की गुजरातकडून आगमी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. त्याची बंदी तीन महिन्यांवरून एक महिना अशी कमी करण्यात आली. त्यामुळे आता तो खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
साउथ आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्स (SAIDS) च्या निवेदनानुसार २१ जानेवारीला SA20 स्पर्धेतील एमआय केपटाऊन विरुद्ध डर्बन सुपर जायंट्स संघातील सामन्यानंतर रबाडा डोपिंग टेस्टमध्ये फेल झाला होता. त्याला आयपीएल २०२५ दरम्यान १ एप्रिलला याबाबतचा निकाल देण्यात आला. त्यामुळे ३ एप्रिलला तो मायदेशी परतला.
गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनीही स्पष्ट केले आहे की रबाडाने त्याच्या बंदीचा कालावधी पूर्ण केला असून तो मंगळवारी (६ मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीकडून गांजा, कोकेन, मेथाम्फेटामाइन किंवा डायमॉर्फिन यासारख्या मादक पदार्थांच्या सेवनासाठी देण्यात येणाऱ्या शिक्षेप्रमाणेच रबाडावरही कारवाई झाली होती. दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेटनेही या प्रकरणाचा खेद वाटत असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेटचीही माफी मागितली आहे.
दरम्यान, रबाडा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीही दक्षिण आफ्रिकेसाठी उपलब्ध असणार आहे. दक्षिण आफ्रिकेला जून २०२५ मध्ये लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा अंतिम सामना खेळायचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेदरम्यान ४७ विकेट्स घेतल्या आहेत.