डिस्बायोसिस : मुळापासून उपचाराची गरज
esakal May 06, 2025 11:45 AM

डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट

डिस्बायोसिस म्हणजे आपल्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे असंतुलन. हे असंतुलन पचन, रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि चयापचय यांसारख्या अनेक शारीरिक प्रक्रियांवर परिणाम करू शकते. फंक्शनल मेडिसिन या संकल्पनेत, डिस्बायोसिसचा उपचार हा केवळ लक्षणांवर आधारित न राहता, मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करून केला जातो.

डिस्बायोसिसची कारणे

  • अतिसंवेदनशील आहार (उच्च साखर व रिफाइंड कार्ब्स, प्रक्रिया केलेले अन्न)

  • अतिरिक्त अँटिबायोटिक्सचा वापर दीर्घकालीन तणाव

  • झोपेचा अभाव अनियमित जीवनशैली

या सर्व घटकांमुळे आतड्यांतील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचे प्रमाण बिघडते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

उपचारांसाठीचा प्रोटोकॉल

फंक्शनल मेडिसिनमध्ये डिस्बायोसिसच्या उपचारासाठी 5R प्रोटोकॉल वापरला जातो:

  • Remove (काढून टाका) : ज्यामुळे सूज (इन्फ्लमेशन) किंवा असंतुलन होते असे अन्नपदार्थ (अतिरिक्त धान्ये, रिफाइंड पदार्थ, व दूध हे इन्फ्लेमेटरी असू शकतात), अँटिबायोटिक्सचे संक्रमण काढून टाकणे.

  • Replace (बदल करा) : पचनासाठी आवश्यक असलेल्या डायजेस्टिव्ह एंझाइम्स आणि पोषक घटकांची भरपाई करणे.

  • Reinoculate (पुनःस्थापन करा): प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सच्या मदतीने चांगल्या जीवाणूंची संख्या वाढवणे.

  • Repair (दुरुस्ती करा) : आतड्यांच्या अस्तराची दुरुस्ती करण्यासाठी पोषक तत्त्वांचा वापर करणे (झिंक सप्लिमेंट).

  • Rebalance (पुनर्संतुलन): तणाव व्यवस्थापन, नियमित व्यायाम, आणि झोपेच्या सवयी सुधारून संपूर्ण आरोग्याचे संतुलन साधणे.

  • उपचार आणि आहार

    डिस्बायोसिसच्या उपचारात प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सचा वापर केला जातो. प्रोबायोटिक्स म्हणजे चांगले जीवाणू, जे आतड्यांतील संतुलन पुनर्स्थापित करतात. प्रीबायोटिक्स म्हणजे अशा आहारातील घटक, जे या चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करतात. तसेच, बोन-ब्रॉथ (चिकन किंवा मटण अळणी सूप), कोशिंबिर, काही फळ, सर्व भाज्या आणि एका वेळेस एकच धान्याचा समावेश करणे उपयुक्त ठरते.

    वैयक्तिकृत उपचार

    फंक्शनल मेडिसिनमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैली, आहार, आणि वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना तयार केली जाते. यामुळे, डिस्बायोसिसच्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करून दीर्घकालीन आरोग्य सुधारणा साधता येते. डिस्बायोसिस हा केवळ पचनाशी संबंधित नसून, संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करणारा घटक आहे. फंक्शनल मेडिसिनच्या समग्र दृष्टिकोनामुळे, या समस्येचे मूळ कारण शोधून, योग्य उपचार करून, आरोग्याचे संतुलन साधता येते.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.