सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune husband killed wife: पुण्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. पतीने मध्यरात्री बायकोचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हे कृत्य लपवण्यासाठी योजना आखली. पण त्याचं बिंग फुटले. आरोपी नवरा मृतदेह दुचाकीवर नेत होता, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी नांदेड सिटी अन् आंबेगाव परिसरात पसरली अन् एकच खळबळ उडाली.
नांदेड सिटी परिसरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. आरोपी पती राकेश रामनायक निसार याने आपली पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दुचाकीवरून नेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
दिलेल्या माहितीनुसार, राकेश मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तपासणीत बबिताचा मृतदेह आढळून आला आणि खूनाचा प्रकार उघडकीस आला. राकेशने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा नोंदवून राकेश याला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत. स्थानिकांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.