सोलापूर : इयत्ता बारावीचे वर्ष म्हटले की विद्यार्थी खासगी क्लास (शिकवणी वर्ग) लावतात. मात्र, ग्रामीण भागातील रजिया मुल्ला हिने खासगी क्लास न लावता ८६.५० टक्के गुण मिळवून दयानंद वाणिज्य महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवले आहे.
रजिया हिला एकूण ५९० गुण मिळाले आहेत. मूळची अरळी (ता. मंगळवेढा) येथील रजियाचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व नंतर माध्यमिक शाळेत झाले आहे. तिचे वडील गुलाब मुल्ला हे गावातील माध्यमिक शाळेत शिपाई असून आई शिवणकाम करते. दहावीनंतर दयानंद वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या रजिया हिने अकरावीला ९३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात पहिला क्रमांक मिळविला. त्यामुळे शिक्षकांनी तिला पुस्तके, मार्गदर्शक पुस्तिका व प्रश्नसंच आदि शैक्षणिक साहित्यांची मदत केली. त्याद्वारे तिने अध्ययन व अभ्यास केला.
बारावीचे वर्ष म्हटले की विद्यार्थी हमखास खासगी क्लास लावतात. मात्र, रजिया हिने क्लास न लावता स्वयंअध्ययनावर भर दिला. त्यासाठी तिला शिक्षकांसह एम. कॉम. झालेल्या वडिलांची साथ लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यास केला. त्या जोरावर तिने ८६.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.
शिक्षकांनी अध्यापनासह शैक्षणिक साहित्यांची मदत केली. त्यांच्यासह वडिलांनीही मला अध्ययनासाठी मार्गदर्शन केले. कोठेही खासगी क्लास न लावता स्वयंअध्ययनावर भर दिले. शिक्षकांसह वडिलांच्या मार्गदर्शनामुळे मी महाविद्यालयात प्रथम आले.
- रजिया मुल्ला, विद्यार्थिनी, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, सोलापूर