मल्हारपेठ : हातपाय तसेच कपडे धुण्यासाठी उरूल येथील धरणावरील कामगाराचा डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. कऱ्हाडच्या रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध घेऊन साडेतीन तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोन महिन्यांत धरण कामगार बुडून मृत झाल्याची ही दुसरी घटना आहे. यशवंत दगडू मोरे (वय ४०, रा. भोसे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर, सध्या रा. उरूल, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे.
उरूल येथे सुरू असलेल्या धरण बांधकामासाठी मोठ्या वाहनावर चालक म्हणून ते काम करत होते. याबाबतची माहिती सुपरवायझर मन्नान अर्षद मुल्ला (वय २९, रा. तासगाव, जि. सांगली) यांनी येथील पोलिसात दिली. रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला. आज सकाळी नातेवाइकांकडे तो सुपूर्द केला. दरम्यान, दोन महिन्यापूर्वीही असाच एका कामगाराचा बुडून मृत्यू झाला होता.