आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशीचा नावलौकीक झाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यात त्याने आपला प्रभाव टाकला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तर शतकी खेळी केली होती. प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो अशी त्याची ख्याती आहे. वैभव सूर्यवंशीचा हा नैसर्गिक खेळ आहे. त्यामुळेच त्याने 35 चेंडूत शतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीनंतर 17 वर्षीय आयुष म्हात्रे चर्चेत आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात त्याने 48 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकार मारत 94 धावा केल्या. त्याचं आयपीएलमधील पहिलं अर्धशतक फक्त सहा धावांनी हुकलं. आयुषने आरसीबीचा फिरकीपटू कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळण्याच्या नादात षटकार मारून शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण तिथेच चूक झाली आणि हातात झेल देत बाद झाला. यानंतर त्याच्या वडिलांना त्याला स्पष्टच सांगितलं की वैभव सूर्यवंशीसारखं व्हायचं नाही.
आयुषचे वडील योगेश म्हात्रे यांनी 17 वर्षीय मुलाची चूक लक्षात घेऊन त्याला सल्ला दिला की, ‘वैभव सूर्यवंशीची कॉपी किंवा त्याच्या शतक ठोकण्याचा प्रयत्न करू नको. तुला तसं काही करण्याची गरज नाही. तुला तग धरून खेळायचं आहे. जर कोणची तुझी तुलना वैभवशी करत असेल तर ते तुझ्या डोक्यात ठेवू नकोस.’ इतकंच काय तर आयुषच्या वडिलांनी शतकाबाबतही आपलं मत मांडलं. ‘जर संघाला विजय मिळत नसेल तर शतकाचं आमच्यासाठी काही महत्त्व नाही. ‘, असं योगेश म्हात्रे यांनी सांगितलं. तसेच पुढच्या सामन्यात पूर्ण 20 षटकं खेळण्याचा आणि टीमला जिंकवण्याचा प्रयत्न करेल.
आयुष म्हात्रे अंडर 19 क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचा ओपनिंग पार्टनर आहे. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत या दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. पण आयपीएल स्पर्धेत दोघंही वेगवेगळ्या संघांकडून खेळत असून दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स, तर आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली. तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकला आणि आयुष म्हात्रेची एन्ट्री झाली.