आयपीएल 2025 मधील 56 व्या सामन्यात आज 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज आणि लोकल बॉय सूर्यकुमार यादव याच्याकडे विराट कोहली याला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मागे टाकण्याची संधी आहे. सूर्यकुमारला यासाठी फक्त 31 धावांची गरज आहे. सूर्यकुमारने या हंगामात गेल्या काही सामन्यांपासून धमाकेदार खेळी केली आहे. त्यामुळे सूर्या गुजरात विरुद्ध ही कामगिरी करत विराटला पछाडणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑरेंज कॅपसाठी पहिल्या 5 फलंदाजांमध्ये विराट कोहली, साई सुदर्शन, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या टॉप 5 मध्ये गुजरातच्या साई सुदर्शन (दुसऱ्या स्थानी) आणि जोस बटलर (पाचव्या स्थानी) या दोघांचा समावेश आहे. तर सूर्यकुमार (तिसऱ्या स्थानी) आहे. त्यामुळे मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यात ऑरेंज कॅपसाठी जोरदार रस्सीखेच असणार आहे. त्यामुळे सूर्याला ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी फक्त 31 धावा करुन भागणार नाही. त्यासाठी सूर्याला मोठी खेळी करावी लागेल.
विराट 505 धावांसह पहिल्या स्थानी आहे. साई सुदर्शन 504 धावांसह दुसर्या क्रमांकावर आहे. दोघांमध्ये फक्त 1 रनचाच फरक आहे. तर पाचव्या क्रमांकावर असलेला जोस बटलर याच्या खात्यात 470 धावा आहेत. त्यामुळे बटलरकडेही विराटला मागे टाकण्यासाठी केवळ 36 धावांचीच गरज आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपसाठी मुंबई विरुद्ध गुजरात या सामन्यात एकूण 3 फलंदाजामध्ये चढाओढ असणार आहे.
सूर्यकुमार यादव याने जवळपास 2 वर्षांपूर्वी 12 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध शतक ठोकलं होतं. सूर्याने तेव्हा 49 बॉलमध्ये 210.20 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 103 रन्स केल्या होत्या. सूर्याने त्या खेळीत 6 षटकार आणि 11 चौकार लगावले होते. त्यामुळे सूर्याकडून पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियममध्ये गुजरात विरुद्ध शतकी खेळीची आशा असणार आहे.