आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारा लोकप्रिय डान्सर आशिष पाटील याने लावणीकिंग म्हणून मराठी सिनेश्रेत्रात नाव कमावलंय. त्याने मराठीतील अनेक सिनेमांमधील गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. अत्यंत कठोर परिस्थितीतून आशिष इथवर पोहोचलाय. तो अमृता खानविलकर ते सोनाली कुलकर्णी अशा अनेक अभिनेत्रींसोबत काम करताना दिसतो. अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आशिषने आता लावणी करताना नऊवारी साडीच का नेसतात आणि डोक्यावरून पदर का घेतात यामागचं कारण सांगितलं आहे.
झेन इंटरटेन्मेंटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आशिष म्हणाला, 'मला सांग लावणीला सुरुवातीला डोक्यावरून जो पदर घेतात तो का घेतात? लोकांना असं वाटतं की लावणी म्हंटली की उलटं उभं राहून डोक्यावर पदर घेऊन पाय आडवा ठेवून त्या ढोलकीच्या तालावर नाचायचं. पण तसं नसतं. त्यामागे काय कारण आहे? लोकं फक्त परंपरा म्हणून तसं करतात. पण तसं नाहीये. लावणी राजा महाराजांच्या दरबारातून बैठकीतून जेव्हा गावोगावी आली तेव्हा, जसं आताच्या याकाळात आपल्याकडे सोशल प्लॅटफॉर्म आहे सांगायला की इथे इथे आमचा कार्यक्रम होणार आहे. तुम्ही या.'
तो पुढे म्हणाला, 'तसं गावोगावी लावणी होतेय, कुठे होतेय, कुणाला माहीत नसायचं. त्यामुळे प्रत्येक लावणीच्या आधी एक तोडा वाजतो. ढोलकी वाजते. ती एवढी मोठ्याने वाजवली जाते. कारण ती अख्ख्या गावाला जमा करणारी असते की आज इथे कार्यक्रम होतोय तुम्ही सगळे आपापल्या घरातून बाहेर या. तो तोडा खूप मोठा असतो. तो पर्यंत लावण्यवती चेहऱ्यावर पदर घेऊन असायची जोपर्यंत गाव जमा होत नाही. जसं गाव जमा व्हायचं आणि गावाचा प्रमुख तिथे यायचा, तेव्हा तिला ढोलकीवर एक तिहाई दिली जाते. जो तिला इशारा असतो की सगळे आलेत. मग ती लावण्यवती आपला पदर मागे टाकून चेहरा दाखवते.'
या मुलाखतीत आशिषने आणखीही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. नेटकऱ्यांनीही छान माहिती दिल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे.