Rohit Sharma : रोहित शर्माकडे गुजरात विरुद्ध महारेकॉर्डची संधी, हिटमॅन वानखेडेत इतिहास घडवणार?
GH News May 06, 2025 08:08 PM

क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज मंगळवारी 6 मे रोजी 2 शेजाऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या हंगामातील 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात गेल्या 6 सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला आहे. मुंबईने निराशाजनक सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक करत ही किमया केली आहे. मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत. रोहितला गुजरात विरूद्धच्या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

हिटमॅन सिक्सर किंग ठरणार!

रोहित आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि फलंदाजही आहेत. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा चॅम्पियन केलं आहे. तसेच रोहितने या 18 व्या मोसमात फक्त फलंदाज म्हणून खेळतानाही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. रोहितने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 297 षटकार लगावले आहेत. त्यामुळे रोहितला गुजरात विरूद्धच्या सामन्यात घरच्या मैदानात सिक्सचं त्रिशतक पूर्ण करण्याची संधी आहे. त्यासाठी रोहितला फक्त 3 षटकारांची गरज आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, आयपीएलमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. तर सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा माजी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत सर्वाधिक 357 षटकार खेचले आहेत. गेलने आयपीएलमध्ये केकेआर, किंग्स ईलेव्हन पंजाब, पीबीकेएस आणि आरसीबी या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर रोहितने डेक्कन चार्जर्स आणि मुंबईकडून खेळताना 297 षटकार लगावले आहेत.

तसेच आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आयपीएमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 290 षटकार लगावले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार

  • ख्रिस गेल – 357 सिक्स
  • रोहित शर्मा – 297 सिक्स
  • विराट कोहली – 290 सिक्स
  • महेंद्रसिंह धोनी – 262 सिक्स
  • एबी डी व्हीलियर्स -251 सिक्स

कोणता फलंदाज कोणत्या स्थानी?

मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी

दरम्यान मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये 7 विजयासह तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईच्या खात्यात 14 गुण आहेत. त्यामुळे मुंबईचा गुजरातवर मात करत आठवा विजय मिळवण्यासह प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.