Pakistan Army: पाकिस्तान में माशाल्लाह हो गया..! एका वाक्यामुळे झाला पाकच्या लोकशाहीचा खून अन् पंतप्रधान गेला लष्कराच्या मुठीत
esakal May 06, 2025 08:45 PM

भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले. देश एकच असल्यामुळे लोकांमध्ये काही फरक असा नव्हता. पण भारतात लोकशाही रुजली आणि आता जवळजवळ 78 वर्षे झाली भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा आहे पण पाकिस्तान मध्ये मात्र जनरल आयुब खान जनरल याह्या खान जिया ऊल हक, जनरल परवेज मुशर्रफ यांच्यासारखे अनेक लष्करी हुकूमशहा होऊन गेले पाकिस्तानमध्ये आर्मीने वारंवार देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली भारतात मात्र आजपर्यंत असं कधीच झालं नाही.


याच्यामागे काय कारण असेल याचा थोडा विचार करत गेलं तर पाकिस्तानच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या घटना आणि त्याचे परिणाम या लष्करी हुकूमशाहीचे खरे कारण आहे. पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा पंतप्रधान हा नेहमीच लष्करप्रमुखाच्या मुठीत असतो भारताचा लष्कर प्रमुख जरी पावरफुल असला तरी तो पंतप्रधानाला मुठीत ठेवायचा साधा विचार देखील करणार नाही पाकिस्तानातच मग असं का होत गेलं, ते आजच्या या लेखात पाहूया.

पाकिस्तान हे एक नव्याने स्वतंत्र झालेला राष्ट्र होतं त्यातच गरिबी उपासमार धार्मिक उन्माद भ्रष्टाचार शिक्षणाचा अभाव असे अनेक प्रश्न पाकिस्तान समोर होते त्याच काळात 1953 साली लाहोर प्रांतात एक घटना घडली. पाकिस्तान मध्ये अहमदिया मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर होता पण पाकिस्तानातील सर्वात मोठी जमात असणाऱ्या सुन्नी मुस्लिम यांच्यात आणि अहमदियांच्यात वाद नेहमीचा होता. 

त्याचवेळी मजलीस-ए-अहरार आणि इतर काही सुन्नी धार्मिक गटांनी आंदोलन सुरू केलं. त्यांची मागणी होती की अहमदिया समाजाला गैर-मुस्लिम घोषित करावं, आणि त्या समुदायाचे सदस्य असलेले परराष्ट्र मंत्री झफरुल्ला खान यांना पदावरून हटवावं. हे आंदोलन काही दिवसांतच हिंसक दंगलीत बदललं – जाळपोळ, हत्या आणि अशांतता. सरकार आणि पोलिस काहीही करू शकले नाहीत. मग पंतप्रधान ख्वाजा नझीमुद्दीन यांनी लष्कराला मदतीसाठी बोलावलं.

६ मार्च १९५३ रोजी मेजर जनरल आझम खान यांनी लाहोरमध्ये मर्यादित मार्शल लॉ लागू केला. ही च्या इतिहासातील पहिली लष्करी हस्तक्षेपाची घटना होती. म्हणजे एक प्रकारे लाहोर या प्रांता पुरता संपूर्ण राज्यकारभार लष्कराच्या हातात आला म्हणजे एक राज्य थोडक्यात लष्कराच्या हातात गेलं. याचा परिणाम असा झाला की काही दिवसांत लाहोर शांत झाला. सगळे सरकारी ऑफिसेस चालू झाले. सगळे कर्मचारी वेळेत ऑफिसमध्ये हजर राहू लागले. लाहोर मधले रस्ते गटारी सगळं काही स्वच्छ झालं. म्हणजे थोडक्यात लोक आपलं काम करू लागले. 
जनरल आझम खान यांना लोक देवदूत मानू लागले.

लोकांनी लष्कराची भरपूर प्रशंसा केली त्यांना वाटलं की अशा प्रकारची लष्करी शिस्त आणि सुव्यवस्था फक्त पाकिस्तानची आर्मीच राखू शकते. त्यामुळे पाकिस्तान मध्ये लष्करच सर्वोच्च अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. सामान्य अडाणी अशिक्षित लोकांना मार्शल लॉ चा अर्थ समजत नव्हता त्याचा उच्चारही करता येत नव्हता. पण ते खुश होते. त्यामुळे ते म्हणायचे पाकिस्तान में माशाल्लाह हो गया.  म्हणजे देवाच्या कृपेने सगळं काही ठीक झालं म्हणजेच मार्शल लॉ लागला. म्हणजे मार्शल ला ही राज्यव्यवस्थेची सर्वात मोठी पायरी आहे असं लाहोरच्या लोकांचं मत झालं, आता हे झालं लाहोर मध्ये मग अख्या पाकिस्तानचं काय झालं.

तर 1950 च्या दशकात सबंध पाकिस्तानातच अस्थिरता होती. पंतप्रधान वारंवार बदलत होते – लियाकत अली खान यांची हत्या झाली, त्यानंतर नझीमुद्दीन, मोहम्मद अली बोग्रा, चौधरी मोहम्मद अली असे अनेकजण आले-गेले. कोणतीही सत्ता टिकत नव्हती. तुलना करून बघितली तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतात मात्र एकच आणि स्थिर सरकार होतं. 

सलग-17 वर्ष जवाहरलाल नेहरूच भारताचे पंतप्रधान होते पाकिस्तान मध्ये मात्र असं झाल नाही. भारताने 1950 लाच संविधान लागू केलं पाकिस्तानचे संविधान 1956 साली तयार झालं. पाकिस्तानातल्या या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा आणि लष्करप्रमुख जनरल अय्यूब खान हे दोघं खऱ्या अर्थाने सत्ता उपभोगत होते.  देशात अराजक माजलेलं होतं – भ्रष्टाचार, अस्थिरता आणि लोकांचा राजकारणावरचा आणि राजकारण्यांच्या वरचा विश्वास उडालेला.

त्यामुळे २७ ऑक्टोबर १९५८ रोजी इस्कंदर मिर्झा यांनी पंतप्रधानाचं सरकार बरखास्त केलं, 1956 ला लागू झालेलं संविधान दोनच वर्षांनी रद्द केलं. आणि देशभर मार्शल लॉ लागू केलं. म्हणजे संपूर्ण देशात आता पाकिस्तानच्या लष्कराची सत्ता आली. हा सगळा डाव राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा आणि आयुब खान या दोघांनी मिळून टाकला असं असलं तरी पुढच्या वीस दिवसात आयुब खान यांनी इस्कंदर मिर्झा म्हणजे राष्ट्रपतींना देखील उचलून बाजूला फेकून दिले आणि सगळी सत्ता आपल्या तब्येत घेतली. ते पाकिस्तानचे सर्वेसर्वा बनले. 

पाकिस्तानचं लष्कर हे पाकिस्तानच्या लोकांसाठी देवदूत वाटायला अगोदरच लागलं होतं त्यात आयुब खान यांनी स्वतःची आपल्या मीडियाच्या माध्यमातून एका हिरो सारखी प्रतिमा बनवून घेतली. त्यांच्या काळात रस्ते, धरणं, शाळा, उद्योग उभे राहिले – लोकांनी ते सगळं लष्कराच्या नेतृत्वाखाली झालं, असं मानलं. आयुब खान यांच्याकडे देशाचा तारणहार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. रेडिओ आणि वर्तमानपत्रे दिवस रात्र अयुब खान यांचे गुणगान करत होती.

पण थोड्या दिवसात लोकांचा आयुब खान यांच्याकडून अपेक्षाभंग झाला परत एकदा भ्रष्टाचार बोकाळला अस्थिरता निर्माण झाली त्यात 1965 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला त्यामुळे 'देशाचा तारणहार' ही प्रतिमा मोडून गेली. त्यामुळे त्यांनी सगळा कारभार जनरल याह्या खान या लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात दिला. 

पाकिस्तानी लोकांना पुन्हा एकदा नवा आनंद झाला नवा लष्करशहा आला म्हणजे आता सगळं काही माशाल्लाह मुळे ठीक होणार अशा पद्धतीने ते वागू लागले. पण 1971 ला याह्या खानाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा भारताने पुन्हा एकदा दारून पराभव केला. पुन्हा अपेक्षाभंग, पुन्हा एकदा तीच परिस्थिती. त्यानंतर काही काळासाठी का होईना पाकिस्तानात लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार आलं. पण ते जास्त दिवस टिकले नाही. पुन्हा जिया उल हक या लष्कर शहाने परत एकदा पाकिस्तानचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला सरकार फेकून दिलं ते साल होतं 1979.

अशाप्रकारे हा क्रम चालूच राहिला 1999 ला कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्या वेळचे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशरफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे हकालपट्टी करून देश आपल्या ताब्यात घेतला. अशा प्रकारे प्रत्येक नवीन लष्कर शहा आला की पाकिस्तानला नवी उभारी येथे आणि आता सगळं काही ठीक होणार असं वाटायला लागतं पण हे एक दुष्टचक्र आहे हे पाकिस्तानला कधीच कळलं नाही कारण लोकांनी सरकार निवडून देणे लोकप्रतिनिधींनी आपली कामे करणे आणि लोकशाही म्हणजे काय या गोष्टी पाकिस्तानातल्या लोकांना कधी समजल्याच नाहीत.

त्याच्या तुलनेत भारत आज पाकिस्तानच्या किमान 50 वर्ष पुढे आहे असं असण्याचं कारण म्हणजे इथला विकास लोकशाहीच्या स्वातंत्र्याच्या वातावरणात झालाय त्याची गती थोडीफार कमी जास्त असेल पण उद्या एखादा लष्करशहा येऊन जर पंतप्रधानाला हटवू पाहील तर या देशातली जनता बंड करून उठेल आणि लष्करशहाला घरी पाठवेल इतक्या खोलवर भारतात लोकशाही मुरलेली आहे भारताच्या घटनाकारांना त्याचबरोबर त्यावेळच्या भारताच्या प्रमुख नेत्यांना या गोष्टीचे श्रेय दिलं पाहिजे.

आज पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा अगतिक अवस्थेत दिसतोय त्यामुळे याच अगतिकतेचा फायदा घेऊन जर भविष्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा एकदा असीम मुनीर आतापर्यंतच्या पूर्वीच्या लष्कर शहांचा कित्ता गिरवतील याबद्दल मला शंका वाटत नाही कारण लष्कराने असं काही करणे यात काही गैर आहे असं मुळात पाकिस्तानातल्या लोकांना वाटत नाही लष्कराला तर ही लोकांची भावना म्हणजे एक पर्वणीच आहे त्यामुळे ज्या दिशेने आता भारत पाकिस्तान मधील तणाव चालला आहे ती दिशा पाकिस्तानात येऊ घातलेल्या लष्करी राजवटीची आहे की काय असा प्रश्न पडतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.