सोमाटणे, ता. ६ ः कासारसाई धरणात केवळ २५.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, आढले, पुसाणे व मळवंडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर गेला आहे. त्यामुळे, पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना व शेतकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचे व अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कासारसाई, आढले, पुसाणे आणि मळवंडी ही धरणे शेती आणि पाणीयोजनांसाठी वापरली जातात. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तापमान चाळीस अंशांच्या आसपास पोहोचल्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी झाला असून, विशेषतः बाष्पीभवनामुळे या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे. कासारसाई धरणात सध्या केवळ ४.०८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, एकूण पाणीसाठा ५.४० दशलक्ष घनमीटर इतका आहे. हा पाणीसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढाच शिल्लक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी अत्यावश्यक गरजेनुसारच पाणी वापरावे, तसेच कोणताही अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.
PNE25V11897
---