फोटो : kan65.jpg सुशांत नाईक
62135
आचरा मार्गावरील वरवडे हद्दीतील काम दोन वर्षे रखडले
सुशांत नाईक : पालकमंत्री, खासदार, आमदार असूनही रस्त्याची दुरवस्था
कणकवली, ता. ६ : जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि कुडाळचे आमदार हे वरवडे गावचे आहेत. मात्र याच वरवडे गावातून जाणाऱ्या आचरा रस्त्याचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे. सत्तेमध्ये असूनही या रस्त्याचा प्रश्न या लोकप्रतिनिधींना सोडवता आलेला नाही हे दुदैव आहे अशी टीका युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केली.
श्री. नाईक म्हणाले, कणकवली आचरा मार्गावरील वरवडे गावातील टप्प्यासाठी दोन वर्षापूर्वी ३० कोटींचा निधी मंजूर झाला. तसेच या रस्त्याचे कामही सुरू झाले. मात्र गेल्या दोन वर्षात हा रस्ता पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही. प्रत्येक निवडणुकीला पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि कुडाळचे आमदार निलेश राणे हे वरवडे गावात निवडणुकीवेळी मतदानाला येतात. पण त्यांच्याच गावातील रस्त्याचे काम त्यांना गेल्या दोन वर्षात पूर्ण करता आलेले नाही.
नाईक म्हणाले, गेल्या वर्षी ठेकेदाराने वरवडे गावातील रस्ता फक्त खोदून ठेवला होता. यात वाहन चालकांनी मोठी गैरसोय झाली होती. यात यंदा फक्त एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. पावसापूर्वी दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणाऱ्या मोऱ्या, पूल आदींच्या बांधकामासाठी रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. तर काही ठिकाणी रस्ता उंच करण्यासाठी डांबरी रस्ता फोडला जात आहे. मात्र ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास न गेल्यास यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा वाहन चालकांचे हाल होणार आहेत. त्याचा मोठा त्रास कणकवली ते आचरा हद्दीत येणाऱ्या अनेक गावातील वाहन चालक आणि प्रवाशांना होणार आहे.