MI vs GT: जॅक्स-सूर्या पास, पण बाकी नापास, मुंबई इंडियन्सची बॅटिंग ढेपाळली; गुजरातसमोर सोप्पं लक्ष्य
esakal May 07, 2025 06:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (६ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. मात्र, त्यांचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले राहिले नाही. त्यामुळे मुंबईला थोडा फायदा झाला.

परंतु तरी सलग ६ सामने जिंकून खेळायला उतलेल्या फलंदाजी या सामन्यात कोलमडल्याचे दिसले. त्यांना कसेबसे दीडशे धावा पार करता आल्या आहेत. मुंबईने गुजरातसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर येण्यासाठी महत्त्वाचा आहे.

या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत मुंबईला प्रथम फलंदाजीला बोलावले. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी डावाची सुरुवात केली.

पण मोहम्मद सिराजने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर रायन रिकल्टनला २ धावांवर साई सुदर्शनच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्शद खानने रोहित शर्माचा अडथळा दूर केला. रोहित ८ चेंडूत ७ धावा करून बाद झाला.

पण त्यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव पुढे नेला. यादरम्यान गुजरातच्या क्षेत्ररक्षकांकडून काही झेलही सुटले, त्यामुळे त्याचा फायदा मुंबई इंडियन्सलाही झाला. विल जॅक्सनेही मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत सूर्यकुमारसोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्याचबरोबर त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.

दरम्यान ११ व्या षटकात सूर्यकुमारला साई किशोरने बाद करत ही जोडी तोडली. त्याच्या पुढच्या षटकात विल जॅक्सला राशीद खानने फसवलं. जॅक्स ३ षटकार आणि ५ चौकारांसह ३५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने २४ चेंडूत ३५ धावा केल्या.

त्यानंतर मात्र मुंबईची धावगती मंदावली. त्याचबरोबर तिलक वर्मा (७), कर्णधार हार्दिक पांड्या (१), नमन धीर (७) हे देखील स्वस्तात बाद झाले. पण शेवटी कॉर्बिन बॉशने आक्रमक शॉट्स खेळले, त्यामुळे मुंबईला दीडशे धावा पार करता आल्या.

पण, बॉशला शेवटच्या षटकात राशीद खान आणि जॉस बटलरने मिळून धावबाद केले. बॉशने २२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा केल्या.

शेवटी दीपक चाहरने चौकार ठोकत मुंबईला २० षटकात ८ बाद १५५ धावांपर्यंत पोहचवले. दीपक ८ धावांवर नाबाद राहिला, तर कर्ण शर्मा १ धावेवर नाबाद राहिला.

गुजरातकडून गोलंदाजी करताना सहाही गोलंदाजांना विकेट्स मिळाल्या. आर साई किशोरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा, राशीद खान आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.