IPL 2025 : पावसाचा खेळ, मग गुजरातचा मुंबईवर शेवटच्या चेंडूवर विजय; GT पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल, MI चे काय?
esakal May 07, 2025 07:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना पावसामुळे गाजला. दुसऱ्या डावात सातत्याने पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना कधी मुंबईच्या कधी गुजरातच्या बाजूने झुकत होता. पण अखेर या सामन्यात गुजरातने डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

हा सामना जिंकून गुजरातने ११ सामन्यांतील ८ विजयासह १६ गुण मिळवत पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. मात्र सलग ६ विजयानंतर पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता मुंबई १२ सामन्यांनंतर ७ विजय आणि ५ पराभवांनंतर १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.

या सामन्यात १८ व्या षटकानंतर पावसाच्या व्यत्ययानंतर जेव्हा पुन्हा सामना सुरू झाला, त्यावेळी विजयासाठी १९ षटकात १४७ असे आव्हान ठेवण्यात आला. म्हणजेच विजयासाठी पावसानंतर खेळ सुरू झाला, तेव्हा गुजरातला ६ चेंडूत १५ धावांची गरज होती. गुजरातने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला.

गुजरातकडून साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. हे दोघेही फॉर्ममध्ये आहेत. परंतु, सुरुवातीला मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार वाऱ्याच्या मदतीसह गुजरातला मोठे शॉट्स खेळू दिले नाहीत.

दुसऱ्याच षटकात सुदर्शनला ५ धावांवर ट्रेंट बोल्टने यष्टीरक्षक रायन रिकल्टनच्या हातून झेलबाद केले. पण त्यानंतर शुभमन गिल आणि जॉस बटलर यांनी डाव पुढे नेला.

त्यांनी मुंबईच्या तिखट माऱ्याचा संयमी सामना करताना गुजरातला सामन्यात पुढे ठेवले होते. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. पण अखेर त्यांची ७२ धावांची भागीदारी अश्वनी कुमारने १२ व्या षटकात बटलरला बाद केले. बटलरने २७ चेंडूत ३० धावांची खेळी केली.

नंतर शेरफेन रुदरफोर्डने आक्रमक खेळत डाव पुढे नेला. यादरम्यान १४ व्या षटकानंतर सामना पावसामुळे काही काळ थांबला. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार गुजरात ६ धावांनी पुढे होते. पण लगेचच सामना नंतर सुरू झाला. त्यावेळी षटके कमी करण्यात आली नाहीत.

सामना सुरू झाल्यानंतर १५ व्या षटकात बुमराहने शुभमन गिलला त्रिफळाचीत केले. शुभमन गिलने ४६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. पुढच्या षटकात रुदरफोर्डला बोल्टने पायचीत केले. रुदरफोर्डने १५ चेंडूत २८ धावांची खेळी केली. शाररुख खानही काही करू शकला नाही. त्याला ६ धावांवर जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले.

राशिद खानला १८ व्या षटकात अश्वनी कुमारने २ धावांवर पायचीत केले. पण १८ व्या षटकानंतर पुन्हा पावसामुळे सामना थांबला. त्यावेळी मुंबई डकवर्थ लुईस नियमानुसार ४ धावांनी पुढे होते. त्यावेळी गुजरातच्या ६ बाद १३२ धावा झाल्या होत्या.

यावेळी पाऊस जोरात झाल्याने त्याच बराच वेळ गेल्याने एक षटक कमी करण्यात आले आणि गुजरातसमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यावेळी हे षटक दीपक चाहरने टाकले.

दीपक चाहरच्या पहिल्याच चेंडूवर राहुल तेवतियाने चौकार मारला. पुढच्या चेंडूवर एक धाव आली. तिसऱ्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने षटकार खेचला. चौथा चेंडू नोबॉल झाला. त्यामुळे नंतर शेवटच्या २ चेंडूवर १ धावेची गरज गुजरातला होती. पण याचवेळी पाचव्या चेंडूवर कोएत्झी १२ धावांवर बाद झाला. पण अखेर अर्शद खान आणि राहुल तेवतिया यांनी एक धाव पूर्ण केली. मुंबईने धावबादचा प्रयत्न केला. पण गुजरातने विजय मिळवला.

मुंबईकडून जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दीपक चाहरने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मुंबईला २० षटकात ८ बाद १५५ धावाच करता आल्या.

मुंबईकडून विल जॅक्सने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. जॅक्सने ३५ चेंडूत ही खेळी करताना ५ चौकार आणि ३ षटकार मारले. सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावांची खेळी केली. याशिवाय कॉर्बिन बॉशने २२ चेंडूत २७ धावांची खेळी केली. बाकी कोणालाही १० धावांचा टप्पाही पार करता आला नाही.

गुजरातकडून साई किशोरने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा, राशीद खान आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.