MI vs GT: हार्दिक पांड्याच ठरला Mumbai Indians साठी व्हिलन! 'त्या' ओव्हरमुळे नकोसा विक्रमही केला नावावर
esakal May 07, 2025 09:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (६ मे) मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार ३ विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे या सामन्यात अडथळा आला होता. पण शेवटच्या चेंडूवर गुजरातने विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५५ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर मुंबईत जोराचा वारा सुरू झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा घेत गुजरातला पॉवरप्लेमध्ये मोठे शॉट्स खेळू दिले नव्हते.

गुजरातने दुसऱ्या षटकात साई सुदर्शनची विकेटही ५ धावांवर गमावली होती. जोरदार वाऱ्यामुळे गिलने अंपायर्सकडे सामना थांबवण्यासाठीही विचारणा केली. पण अंपायर्सने खेळ पुढे चालू ठेवला. ५ षटकांनंतर डकवर्थ लुईस नियम लागू होतो, त्यामुळे सामना रद्द होण्याची नामुष्की टळते.

दरम्यान ६ षटकात गुजरातला डकवर्थ लुईसनुसार जिंकण्यासाठी ४० धावांची गरज होती. पण त्यांना १ बाद २९ धावाच करता आल्या होत्या. पण नंतर हार्दिक पांड्याने टाकलेले ८ वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले.

या षटकाआधी डकवर्थ लुईस नियमाच्या समीकरणानुसार ६ धावांनी गुजरात मागे होते. पहिल्या चेंडूवर शुभमन गिलने जॉस बटलरसोबत एक धाव काढली. त्यानंतर बटलरने दुसऱ्या चेंडूवर चौकार वसूल केला. पुढच्या चेंडूवरही एक धाव निघाली.

त्यानंतर चौथा चेंडू हार्दिकला पाचवेळा टाकावा लागला. त्याने वाईड, नो बॉल, वाईड, नो बॉल असे चार चेंडू टाकल्यानंतर चौथा वैध चेंडू टाकला, ज्यावर शुभमन गिलने षटकार वसूल केला. पाचव्या चेंडूवर एक धाव निघाली. त्यानंतर पुन्हा सहावा चेंडू हार्दिकने वाईड टाकला. त्यामुळे या षटकात एकूण १८ धावा निघाल्या आणि समीकरण बदलले. गुजरात सामन्यात पुढे आले.

या षटकात हार्दिकने ११ चेंडू टाकले. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला. हार्दिक आयपीएलमध्ये एकाच षटकात सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. यापूर्वी मोहम्मद सिराज, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर आणि संदीप शर्मा यांनीही एका षटकात ११ चेंडू टाकण्याचा नकोसा विक्रम केलेला आहे.

आयपीएलमध्ये एकाच षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारे गोलंदाज
  • ११ चेंडू - मोहम्मद सिराज (वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू, २०२३)

  • ११ चेंडू - तुषार देशपांडे (वि. लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई, २०२३)

  • ११ चेंडू - शार्दुल ठाकूर (वि. कोलकाता नाईट रायडर्स, २०२५)

  • ११ चेंडू - संदीप शर्मा (वि. दिल्ली कॅपिटल्स, २०२५)

  • ११ चेंडू - हार्दिक पांड्या (वि. गुजरात टायटन्स, २०२५)

दरम्यान, यानंतर गिल आणि बटलरने गुजरातला सामन्यात पुढे ठेवले होते.पण बटलरला १२ व्या षटकात अश्वनी कुमारने ३० धावांवर बाद केले. पण तरी इम्पॅक्ट प्लेअर शेरफेन रुदरफोर्डने आक्रमक खेळ केला.

त्यामुळे १४ षटकांनंतर जेव्हा सामना पावसामुळे थांबला तेव्हा गुजरात डकवर्थ लुईसनुसार ६ धावांनी पुढे होते. पण नंतर लगेचच सामना पुन्हा आहे त्या स्थितीत सुरू झाला. त्यानंतर मात्र ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिले.

बुमराहने गिलला ४३ धाावंवर आणि शाहरुख खानला ६ धावांवर त्रिफळाचीत केले. बोल्टने रुदरफोर्डला २८ धावांवर पायचीत केले. राशीद खानला अश्वनी कुमारने २ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे जेव्हा १८ व्या षटकानंतर पुन्हा सामना थांबला, त्यावेळी मुंबई ४ धावांनी पुढे होते.

पण नंतर पाऊस थांबल्यानंतर एक षटक कमी करण्यात आले आणि गुजरातसमोर १९ षटकात १४७ धावा असं आव्हान ठेवण्यात आलं. म्हणजेच १९ व्या षटकात गुजरातला १५ धावांची गरज होती. पण १४ धावा गेराल्ड कोएत्झी आणि राहुल तेवतियाने केल्या, तर विजयी धाव अर्शद खानने घेतली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. दरम्यान यात हार्दिकचे ८ षटक मुंबईला मात्र महागात पडले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.