भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शहबाज शरीफ यांनी X वर एक पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी भ्याड हल्ले करण्यात आले. युद्ध लादणाऱ्या या कृतीच ठोस प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि हे उत्तर दिलं जातय. पाकिस्तानी सैन्य आणि जनता एकजूट आहे. संपूर्ण देशाच मनोबल उंचावलेलं आहे” असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. “शत्रू राष्ट्राचा सामना कसा करायचा ते पाकिस्तानी सैन्याला माहित आहे. आम्ही कधी त्यांचे नापाक इरादे यशस्वी होऊ देणार नाही” असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. मुरीदके, बहावलपूर येथील नागरिकांना लक्ष्य केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. महिला, मुलांसह नागरिक शहीद झाल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे. भारताच्या या आक्रमक कृतीमुळे व्यावसायिक हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे.
“आम्ही भारताच्या या कारवाईचा निषेध करतो. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय नियमांच उल्लंघन केलं आहे” असं पाकिस्तानी पीएमच म्हणणं आहे. भारताच्या या कृतीमुळे दोन अणवस्त्र संपन्न देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे असा पाकिस्तानचा दावा आहे. आम्ही आमची वेळ आणि ठिकाण ठरवून या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ असं पाकिस्तानच म्हणणं आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?
“पाकिस्तान पूर्ण क्षमतेने या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. हे कर्ज तसच फेडू, जसं फेडलं पाहिजे” असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले. “त्यांनी दहशतवादी तळं किंवा नागरिकांना लक्ष्य केलय ते आंतरराष्ट्रीय मीडिया जाऊन पाहू शकते” असं ख्वाजा असिफ म्हणाले. या कारवाईनंतर पाकिस्तानने 48 तासांसाठी आपल्या हवाई क्षेत्रातील सर्व वाहतूक बंद केली आहे. भारताने या कारवाईद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल कराराला स्थगित असे निर्णय घेऊन पाकिस्तानला आधीच दणका दिला होता.