भारताचा स्टार क्रिकेटपटू कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय संघाला जून २०२५ मध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे.
या मालिकेपासून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ या नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. या नव्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी रोहितने कसोटीतून अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता रोहित केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना दिसणार आहे.
रोहित कसोटी संघाचा कर्णधारही होता. पण गेल्या काही मालिकांमध्ये त्याच्या नेतृत्वात भारताची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्याच्या कसोटीमधील भविष्यावर प्रश्नचिन्ह होते. अखेर रोहितने कसोटीमधून निवृत्तीची मोठी घोषणा केली.
परंतु, आता निवृत्ती घेतल्याने भारतीय निवड समितीला नव्या कसोटी कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे.
यावेळी बैठकीत निवड समिती कर्णधाराबाबतही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. पण आता पुढचा कसोटी कर्णधार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी कोणते पर्याय भारतासमोर आहेत, याचा थोडक्यात आढावा घेऊ.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. कारण त्याला गेल्यावर्षी कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणूनही घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे तोच पुढचा कसोटी कर्णधार बनण्याची दाट शक्यता आहे.
परंतु, यासाठी आता बुमराहचा फिटनेसही महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बुमराह गेल्या काही वर्षात अनेकदा दुखापतींमुळे महत्त्वाच्या स्पर्धांना मुकला आहे. तो काही दिवसांपूर्वीच दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धाही खेळू शकला नव्हता.
त्यामुळे आता त्याच्या दुखापतीची जोखीम पत्करून त्याच्याकडे कर्णधारपद दिले जाणार का, हे पाहावे लागले. बुमराहने आत्तापर्यंत प्रभारी कर्णधार म्हणून ३ कसोटीत नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने १ सामना जिंकला आणि २ सामने पराभूत झाले आहेत. बुमराहने ४५ कसोटी सामने खेळताना २०५ विकेट्स घेतल्या आहेत.
शुभमन गिल भारताचा वनडे आणि टी२० क्रिकेट संघांचा उपकर्णधार आहे. त्यामुळे तो देखील कसोटी कर्णधारपदासाठी दावेदार आहे. गिल गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने याआधी ५ टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील ४ सामने जिंकेल आहेत आणि १ सामना पराभूत झाला आहे.
तो सध्या आयपीएलमध्येही गुजरात टायटन्सचे चांगले नेतृत्व करत आहे. त्यामुळे आता त्याच्यावर विश्वास दाखवून भविष्याच्या दृष्टीने त्याच्याकडे कसोटीचे नेतृत्वपद सोपवले जाणार का हे पाहावे लागेल. शुभमन गिलने ३२ कसोटी सामन्यांत ५ शतके आणि ७ अर्धशतकांसह १८९३ धावा केल्या आहेत.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा देखील कर्णधारपदासाठी पर्याय ठरू शकतो. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाला चांगला कर्णधार समजले जाते, कारण तो ज्या जागेवर उभा असतो, तिथून त्याला मैदानावरील चारही बाजूंना नजर ठेवता येते. तो क्षेत्ररक्षण लावण्यासाठीही महत्त्वाची भूमिका पार पाडतो.
अशात रिषभ पंतकडेही कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. पंतने यापूर्वी भारताचे ५ टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यातील २ सामने जिंकले आणि २ सामने पराभूत झाले आहेत. १ सामन्याचा निकाल लागलेला नाही. रिषभ पंतने ४३ कसोटी सामने खेळले असून ६ शतके आणि १५ अर्धशतकांसह २९४८ धावा केल्या आहेत.
मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या कसोटी संघातून बाहेर असला, तरी सध्याचा त्याचा फॉर्म पाहाता त्याला पुन्हा संघात संधी दिली जाऊ शकते. याशिवाय त्याच्याकडे चांगले नेतृत्व कौशल्य असल्याचे त्याने वेळोवेळी सिद्धही केले आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने मुंबईचे नेतृत्व केले आहे.
तसेच त्याच्या नेतृ्त्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपदही जिंकले आहे. याशिवाय तो सध्या पंजाब किंग्सचेही चांगले नेतृत्व करताना दिसत आहे. भविष्याच्यादृष्टीने श्रेयस अय्यर देखील कसोटी कर्णधारपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याने आत्तापर्यंत १४ कसोटी सामने खेळताना १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ८११ धावा केल्या आहेत