मल्टीव्हर्स – मनोरंजक अनुभव
Marathi May 11, 2025 08:27 AM

>> डॉ. विचित्र

गाझामधील पिरॅमिड्सच्या संशोधनाची पार्श्वभूमी असलेल्या या कथानकात पुराणकथा, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सारेच खुबीने एकसंध केले आहेत? उत्कंठा वाढविणारा व रोचक अनुभव देणारा असा हा 'स्टारगेट' चित्रपट आहे?

पुराना कथा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्यांची सरमिसळ करून बनवलेला ‘स्टारगेट’ हा 1994 सालचा एक सुरेख चित्रपट आहे. रोलँड एमिरिच यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे आणि चित्रपटात कर्ट रसेल, जेम्स स्पॅडर असे कसलेले कलाकार अभिनय करताना दिसतात. चित्रपटाची सुरुवात 1928 सालातल्या इजिप्तमध्ये होते. तिथे गाझामधील पिरॅमिड्सचे संशोधन सुरू असते. पुरातत्त्व शास्त्रज्ञ पॉल लँगफोर्ड हे त्याचे नेतृत्व करत असतात. खोदकाम चालू असताना त्यांना एक मोठय़ा आकाराची पोलादी रिंग सापडते. मात्र ही रिंग कसली आहे याचा उलगडा होत नाही. सोबत एक नेकलेसदेखील सापडतो. पॉलची लहान मुलगी कॅथरिन तो नेकलेस स्वतच्या ताब्यात घेते. हे दृश्य संपते आणि चित्रपट वर्तमानकाळ अर्थात 1994 मध्ये परततो.

वयस्क झालेल्या कॅथरिनने आजही वडिलांचे कार्य पुढे चालवलेले असते. अर्थात या खोदकामावर आता सैन्याचे नियंत्रण असते आणि कर्नल जॅक ओ‘निल त्यावर देखरेख ठेवून असतो. या खोदकामाच्या वेळी मिळालेल्या विचित्र चित्रलिपीचा आणि त्या मोठय़ा रिंगचा अजूनदेखील काही उलगडा झालेला नसतो. अशा वेळी कॅथरिन इजिप्त इतिहास आणि भाषाशास्त्रात प्रवीण असलेल्या डॅनियल जॅक्सनला या कामासाठी आमंत्रित करते. डॅनियल सर्वात आधी जुन्या जाणकारांचे प्रयत्न कसे चूक होते ते दाखवून देतो आणि नव्याने या लिपीचा अर्थ लावण्यास सुरुवात करतो. ही लिपी एका स्टारगेटचे वर्णन करणारी असते. काही विशिष्ट नक्षत्रांचे आकार एका ठरावीक रचनेत जुळवल्यावर हे स्टारगेट जागृत होणार असते.

डॅनियलचे हे नैपुण्य बघून त्याला आता ती मोठी रिंग दाखवली जाते. त्या रिंगचा अभ्यास केल्यावर ती रिंग म्हणजे स्टारगेट असल्याचे डॅनियलच्या लक्षात येते. आता तो त्या नक्षत्रांच्या संरचनेच्या मदतीने ते स्टारगेट जागृत करतो आणि रिंगच्या आतमध्ये एक वॉर्महोल निर्माण होते. हे वॉर्महोल कुठे उघडणार, हे बघण्यासाठी आधी त्यातून एक रोबोट रडार पाठवले जाते. त्याने केलेल्या पाहणीनंतर स्वत डॅनियल, कॅप्टन जॅक आणि त्याचे काही सहकारी त्यामध्ये प्रवेश करण्याचे ठरवतात. जॅक हा डॅनियलला नेण्यासाठी नाखुश असतो. मात्र पलीकडे गेल्यानंतर तिथे असणारी चित्रलिपी वाचून नक्षत्रांची संरचना बघणे आणि परतीचे दार उघडणे कसे आवश्यक आहे हे डॅनियल त्याला पटवून देतो आणि जॅकचा नाइलाज होतो.

जॅक, डॅनियल आणि त्यांचे सहकारी आता त्या वॉर्म होलमध्ये प्रवेश करतात. प्रवासासाठी आठवण म्हणून कॅथरिन आपले लॉकेट डॅनियलला देते. वॉर्म होलमध्ये प्रवेश करून दुसऱया बाजूने बाहेर पडलेली डॅनियल आणि टीम पूर्ण आश्चर्यचकित होते जेव्हा ते दुसऱया बाजूला एका भव्य पिरॅमिडच्या दारात उभे असतात. समोर वाळवंट पसरलेले असते. दुसऱया बाजूलादेखील वॉर्म होल उघडण्यासाठी एक चित्रलिपी असते, पण तिच्यातील काही खुणा नष्ट झालेल्या असतात. परतीची वाट बंद झालेली पाहून सर्व जण डॅनियलवर संताप व्यक्त करतात. एक सैनिक तर त्याचे सामानदेखील फेकून देतो. मागचा रस्ता बंद झाल्याने पुढे निघालेल्या सर्वांना अचानक मनुष्यवस्ती दिसते आणि ते सर्व लोक मोठय़ा संख्येने एका नव्या पिरॅमिडची बांधणी करत असतात.

डॅनियलच्या गळ्यातील लॉकेट बघून हे सर्व लोक त्याला आपली सूर्यदेवता ‘रा’ समजतात आणि त्याच्या पुढे नतमस्तक होतात. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपण पृथ्वीवर नसून दुसऱया ग्रहावर पोहोचलो असल्याचे डॅनियलच्या लक्षात येते. हे सर्व मागास लोक ‘रा’ या सूर्यदेवतेची पूजा करत असतात आणि त्या देवतेसाठीच पिरॅमिड उभारत असतात. ही देवता या मागास लोकांचा गैरफायदा घेत असून त्यांना गुलाम बनविण्यात आल्याचेदेखील डॅनियलच्या लक्षात येते. आता तो सर्वांना गुलामीतून मुक्त करण्याचा चंग बांधतो आणि त्यांचे प्रबोधन करण्यास सुरुवात करतो. या सगळ्या गोंधळात खरी सूर्यदेवता ग्रहावर अवतरते आणि संघर्षाला एक वेगळी धार चढते. या सगळ्या मोहिमेचा आनंद लुटायचा असेल तर ‘स्टारगेट’मध्ये प्रवेश करायलाच हवा व तो पाहायलाच हवा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.