IPL 2025: CSK ने अखेर तिसऱ्या विजयाचा दिवा लावला! रहाणेच्या KKR चा पराभव, पण प्लेऑफची आशा कायम; जाणून घ्या समीकरण
esakal May 08, 2025 07:45 AM

बुधवारी (७ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २ विकेट्सने पराभूत केले. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने कोलकाताला पराभूत करत अखेर तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.

चेन्नईचे स्पर्धेतील हंगाम यापूर्वीच संपले आहे. पण या सामन्यातील विजयामुळे त्यांना २ गुण मिळाले असून आता ते १२ सामन्यांनंतर ६ गुणांवर पोहचले आहेत. पण तरी ते १० व्या स्थानीच कायम आहेत. मात्र आता कोलकातासमोरील आव्हान कठीण झाले आहे.

या सामन्यात कोलकाताने १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १९.४ षटकात ८ विकेट्स गमावत १८३ धावा करत पूर्ण केला. चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने अर्धशतक केले, तर पदार्पणवीर उर्विल पटेल आणि शिवम दुबेनेही महत्त्वपूर्ण खेळी केली.

या सामन्यात चेन्नईकडून आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉनवे ही नवीन सलामी जोडी मैदानात उतरली होती. पण दुसऱ्याच चेंडूवर आयुषला वैभव अरोराने शून्यावर माघारी धाडले. तर दुसऱ्या षटकात कॉनवेला मोईन अलीने शून्यावर त्रिफळाचीत केले.

पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उर्विल पटेलने पहिल्या षटकापासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे चेन्नईला सुरुवात आक्रमक मिळाली होती. मात्र त्याचाही अडथळा तिसऱ्या षटकात हर्षित राणाने दूर केला. त्याचा झेल वरुण चक्रवर्तीने दूर केला. उर्विलने ११ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३१ धावा केल्या.

आर अश्विनला या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली होती. पण तो ७ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. त्याही हर्षितनेच अंगक्रिश रघुवंशीच्या हातून झेलबाद केले.

पाठोपाठ ६ व्या षटकात रवींद्र जडेजाही १० चेंडूत १९ धावा करून वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यामुळे पॉवरप्लेच्या ६ षटकातच चेन्नईने ६० धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांची जोडी जमली.

दुबेने एक बाजू सांभाळली असताना ब्रेव्हिसने आक्रमण केले. त्याने वादळी फटके मारताना अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर त्याला १३ व्या षटकात वरूण चक्रवर्तीने रिंकू सिंगच्या हातून झेलबाद केले. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावांची खेळी केली.

त्याने शिवम दुबेसोबत ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. या भागीदारीने चेन्नईला विजयाचा मार्ग सोपा करून दिला. त्यानंतर दुबेने जबाबदारी खांद्यावर घेतली, त्याला एमएस धोनीने साथ दिली.

मात्र चेन्नई विजयाच्या जवळ असताना शिवम दुबे १९ व्या षटकात ४० चेंडूत ४५ थधावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्यानंतर याच षटकात नूर अहमदही २ धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ८ धावांची गरज होती. यावेळी एमएस धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकात ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अंशुल कंबोजने चेन्नईसाठी विजयी चौकार मारला.

वैभव अरोराने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७९ धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणने ३३ चेंडूत सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. आंद्रे रसेलने ३८ धावांची खेळी केली. मनिष पांडेने नाबाद ३६ धावा केल्या, तर सुनील नरेनने २६ धावांची खेळी केली.

चेन्नईकडून गोलंदाजी करताना नूर अहमदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

कोलकातासमोरील समीकरण

कोलकाताने हा सामना पराभूत झाला असला, तरी अद्याप त्यांच्यासाठी प्लेऑफच्या आशा संपलेल्या नाहीत. कोलकाताने १२ सामन्यांत ५ विजय आणि ६ पराभव स्वीकारले आहेत. तसेच एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे त्यांचे ११ गुण आहेत. ते सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत.

त्यांच्याकडे अद्याप २ सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांना आता जास्तीत जास्त १५ गुण मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये पोहचायचे असेल, तर कोलकाताला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

पण याचसोबत ही देखील आशा करावी लागेल की मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे १५ पेक्षाअधिक गुणांपर्यंत पोहचू नयेत आणि पोहचले तरी त्यांचा नेट रन रेट कोलकातापेक्षा कमी असावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.