वूमन्स टीम इंडियाची उपकर्णधार सांगलीकर स्मृती मंधाना हीने वनडे ट्राय सीरिज फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध इतिहास घडवला आहे. स्मृतीने झंझावाती शतकी खेळी केली आहे. स्मृतीने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये चौफेर फटकेबाजी करत हे शतक झळकावलं. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 11 वं शतक ठरलं. स्मृतीने यासह कीर्तीमान केला आहे. स्मृती या 11 व्या शतकासह क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय तर एकूण तिसरी महिला फलंदाज ठरली.
स्मृतीने श्रीलंकेविरुद्ध संयमी सुरुवात केली. त्यानंतर स्मृतीने गिअर बदलला आणि फटकेबाजीला सुरुवात केली. स्मृतीने 101 बॉलमध्ये 116 रन्स केल्या. स्मृतीने 114.85 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. स्मृतीच्या या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. स्मृतीने 92 चेंडूत शतक पूर्ण केलं. स्मृतीने यासह 11 व्या एकदिवसीय शतकासह खास विक्रम आपल्या नावावर केला. स्मृतीने टीम इंडियासाठी सर्वाधिक शतकांचा विक्रम आणखी भक्कम केला. तसेच स्मृती एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 शतक करणारी तिसरी महिला क्रिकेटर ठरली.
स्मृतीआधी ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग आणि न्यूझीलंडची सुजी बेट्स या दोघींनी अशी कामगिरी केलीय. मेग लॅनिंग हीने 15 तर सुजी बेट्स हीने 13 शतकं झळकावली आहेत. तर स्मृती मंधाना हीने इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट हीला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे.
दरम्यान स्मृतीने या ट्राय सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी केलीय. स्मतीने या मालिकेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. स्मृतीने 5 सामन्यांमध्ये 52.80 च्या स्ट्राईक रेटने 264 धावा केल्या आहेत. स्मृतीच्या या खेळीत 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. स्मृतीने गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक लगावलं होतं.
दरम्यान स्मृतीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 300 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 342 धावा केल्या आहेत. भारतासाठी स्मृती व्यतिरिक्त हर्लीन देओल, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रॉड्रिग्स या तिघींनी 40 पेक्षा अधिक धावा केल्या. हर्लिनने 47,जेमीमाह 44 आणि हरमनप्रीतने 41 धावांचं योगदान दिलं. प्रतिका रावलने 30 रन्स केल्या. अमनज्योत कौर हीने 18 धावांचं योगदान दिलं. तर दीप्त शर्माने नाबाद 20 रन्स केल्या. त्यामुळे आता महिला ब्रिगेड श्रीलंकेला किती धावांवर रोखण्यात यशस्वी होते? याकडे क्रिेकट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.