वेल्हे : पानशेत ते घोल रस्त्यावरील दुर्गम कुर्तवडी (ता.राजगड) येथे स्वारगेट आगारामधील एसटी वाहक व चालकास मारहाण झाल्याची घटना रविवार(ता.४) रोजी रात्री नऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात बुधवार (ता.०७) रोजी सायंकाळी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.
या प्रकरणी स्वारगेट आगारामधील एसटी वाहक सत्यवान भाऊसाहेब लव्हारे(वय.४०) मूळ गाव पट्टीवडगाव ता. आंबेजोगाई जि. बीड सध्या राहणार चिखली, पुणे. यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी मयूर पोपट निवंगुणे राहणार आंबी. ता. हवेली जिल्हा पुणे व इतर पाच जण( नाव व पत्ता माहित नाही) त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजता स्वारगेट बस डेपो येथून एसटी बस क्रमांक एम एच :-06 एस 8948 पानशेत परिसरातील घोल येथे मुक्कामासाठी निघाली होती.कुर्तवडी गावच्या हद्दीत रात्री नऊ वाजता एसटी मधील प्रवासी उतरल्यानंतर गाडीच्या टायर मधील हवा चेक करत असताना मयूर निवंगुणे यांनी जोरजोरात शिवीगाळ करून झटापट करून दम देऊन निघून गेला. घोल गावाकडे जाणारे प्रवासी नसल्याने एसटी बस कुर्तवडी गावातच थांबली नंतर पुन्हा साडेदहा वाजण्याच्या सुमारास मयूर याने इतर पाच जणांच्या सहाय्याने हातात असलेल्या लोखंडी रोडने व इतरांनी हातातील फायटरने वाहकास मारहाण करण्यास सुरुवात केली.
तेवढ्यात चालक पांडुरंग पोमण हे सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण केली या मारहाणीमध्ये वाहक व चालक यांना जबर दुखापत झाली असता ते उपचारासाठी पानशेत देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. परिस्थितीचे गांभीर्य पाहिल्यानंतर त्यांना पुढील उपचारा कामी ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आले उपचार झाल्यानंतर वेल्हे पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज मोघे अधिक तपास करीत आहेत.