Tigress Attack : वाघिणीने घेतला तीन महिलांचा बळी; सिंदेवाही तालुक्यातील मेंढा वनपरिक्षेत्रातील घटना
esakal May 11, 2025 05:45 PM

सिंदेवाही : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या तीन महिलांना वाघिणीने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार (ता. १०) दुपार सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल) जंगल परिसरात सुमारास घडली.

शुभांगी मनोज चौधरी (वय ३८), कांताबाई बुधा चौधरी (वय ६०) आणि रेखा शालिक शेंडे (वय ४८, तिन्ही रा. मेंढा माल) अशी मृत महिलांची नावे आहेत. दुसऱ्या एक घटनेत वंदना विनायक गजभिये (वय ५० रा. चारगाव बडगे) या महिलेला वाघाने हल्ला करून जखमी केले.

सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. हातात दोन पैसे मिळावे यासाठी जंगलालगत असलेल्या गावातील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी पहाटेच जंगलात जातात. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल) येथील शुभांगी चौधरी, कांताबाई चौधरी आणि रेखा शेंडे या तिघी गावातील अन्य महिलांसोबत गावाजवळील जंगलात तेंदूपत्ता जमा करण्यासाठी गेल्या होत्या.

दुपार उलटून गेल्यानंतरही तिन्ही महिला घरी परतल्या नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी मेंढा (माल) जंगलात शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असतानाच डोंगरगाव बीटमधील जंगलात तिन्ही महिला मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मृत महिलांमध्ये दोघी एकाच कुटुंबातील सासू-सून आहे. या घटनेमुळे सिंदेवाही वनपरिक्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसऱ्या एका घटनेत वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी झाली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्रातील चारगाव बडगे राखीव जंगलात वंदना विनायक गजभिये ही गावातील अन्य महिलांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने वंदनावर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यामुळे तिने आरडाओरड केली.

तो ऐकून जवळपासच्या इतर महिला व पुरुष मदतीसाठी धावले. लोकांचा आवाज ऐकून वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र या हल्ल्यात वंदना गजभिये गंभीर जखमी झाल्या. वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. जखमी वंदना यांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.