थॅलेसेमियामुक्त भारतासाठी मिशन २०३५ उपक्रमाची सुरूवात
esakal May 12, 2025 01:45 PM

थॅलेसेमियामुक्त भारतासाठी मिशन २०३५ उपक्रमाची सुरुवात
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः भारतातून थॅलेसेमियाचे उच्चाटन करण्यासाठी ‘मिशन २०३५’ या देशव्यापी उपक्रमाची फोर्टिस हेल्थ केअरने सुरुवात केली आहे. फोर्टिस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये २५०० पेक्षा अधिक नागरिकांच्या सहभागातून ‘रेड रन टू अन्ड थॅलेसेमिया’ या उपक्रमाने या मोहिमेची सुरुवात झाली आहे. बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून, त्यांनी जनजागृतीसाठी सक्रिय पाठिंबा दिला आहे.
थॅलेसेमिया हा अनुवांशिक रक्तदोष असून, दरवर्षी १० ते १५ हजार चिमुकले या आजारासह जन्माला येतात. ‘मिशन २०३५’ अंतर्गत या आजारास नोटिफायबल घोषित करणे, केसेसचे ट्रॅकिंग, उच्च प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये जनजागृती करणे, तसेच विवाहपूर्व व गर्भधारणेपूर्व चाचण्या सक्तीच्या करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय एचपीएलसी चाचण्या आणि स्टेम सेल प्रत्यारोपण यासारख्या उपचार सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. फोर्टिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुतोष रघुवंशी यांनी स्पष्ट केले की, थॅलेसेमिया प्रतिबंध करण्यासारखा आजार आहे. त्यामुळे योग्य तपासणी व मार्गदर्शनाने त्यावर नियंत्रण मिळवता येते. फोर्टिस हेल्थकेअर हा बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारून, वैद्यकीय सेवा, जनजागृती, सामाजिक सहभाग आणि सरकारी सहकार्य यांचा समन्वय साधत या रोगाच्या समूळ निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहे. ‘मिशन २०३५’ हा केवळ उपचारात्मक नव्हे, तर आरोग्यसेवा व्यवस्थेमध्ये बदल घडवणारा आणि भारत थॅलेसेमियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.