रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर इंग्लंड कसोटी मालिकेसाठी अशी असू शकते टीम इंडिया, संघाची धुरा…
GH News May 12, 2025 07:08 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 स्पर्धेचं चौथं पर्व जून महिन्यापासून सुरु होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत टीम इंडिया होम आणि अवे अशा दोन्ही ठिकाणी साखळी फेरीचे सामने खेळणार आहे. टीम इंडियाची कसोटी मालिकेची सुरुवात इंग्लंड दौऱ्यापासून होणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर ही मालिका भारतासाठी खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे. कारण दोन दिग्गज अनुभवी खेळाडू या स्पर्धेपासून कसोटी संघाचा भाग नसतील. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार कोण? इथपासून ओपनिंगला रोहित शर्माची आणि तिसऱ्या-चौथ्या स्थानी विराट कोहलीची जागा भरून काढण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे अजित आगरकरच्या नेतृत्वात निवड समितीला 15 खेळाडूंची निवड करणं आव्हानात्मक असणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाच्या घोषणेबाबत अधिकृतरित्या काहीच सांगितलं गेलं नाही. पण 23 मे रोजी कसोटी संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. निवड समिती कोणत्या 15 खेळाडूंना स्थान देईल याबाबत उत्सुकता आहे.

शुबमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा?

रोहित शर्माने कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केल्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिलच्या नावाची चर्चा आहे. शुबमन गिलचं नाव या पदासाठी आघाडीवर आहे. फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. म्हणजेच शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यावर कसोटी लागणार आहे. शुबमन गिलने नेतृत्व स्वीकारलं तर संघासाठी ओपनिंग किंवा तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो.

ओपनिंगसाठी या नावाची चर्चा

शुबमन गिलसोबत डावखुरा यशस्वी जयस्वाल कसोटी संघात ओपनिंगची धुरा सांभाळणार यात काही शंका नाही. पण शुबमन गिलने तिसऱ्या स्थानावर उतरण्याचा निर्णय घेतला तर रोहित शर्माची जागा डावखुरा साई सुदर्शन घेऊ शकतो.

मधल्या फळीची जबाबदारी या खेळाडूंवर

मधल्या फळीत विराट कोहलीची जागा भरून काढण्यासाठी केएल राहुल असू असतो. चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याची संघात निवड केली जाण्याची शक्यता आहे. इतकंच काय तर ऋषभ पंतलाही संघात जागा मिळू शकते. ऋषभ पंतचं नाव 15 खेळाडूत असू शकतं. कारण त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा असण्याची शक्यता आहे.

अष्टपैलू खेळाडू कोण?

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय कसोटी संघात तीन फिरकीपटू अष्टपैलू आणि दोन वेगवान अष्टपैलू खेळाडूंना जागा मिळू शकते. यात फिरकी अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचं नाव असू शकतं. तर वेगवान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शार्दुल ठाकुर आणि नितीश कुमार रेड्डी असू शकतात.

पाच वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते

20 जूनपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कसोटी संघात पाच वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. यात पाच वेगवान गोलंदाजांना जागा मिळू शकते. यात जसप्रीत बुमराह याच्यासह मोहम्मद सिराज, हार्षित राणा, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना जागा मिळू शकते.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा संभाव्य 15 जणांचा संघ: शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि प्रसीद्ध कृष्णा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.