अक्षय बडवे, साम टीव्ही
अभ्यासाच्या तणावाला कंटाळून एम्स रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःचा गळा कापत पुण्यात आत्महत्या केलीय. भोपाळ येथील एम्स रुग्णालयात शिकत असलेल्या तरुणाने पुण्यातील वानवडी परिसरात स्वतःच जीवन संपवलं. उत्कर्ष महादेव हिंगणे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळ बीडचा होता.
पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे हा मूळ जिल्ह्याचा होता. भोपाळ येथील एम्स रुग्णालयात तो प्रथम वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत होता. पुण्यात सुरू असलेल्या एम्स महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शिंगणे पुण्यात आला होता.
आज सकाळी १०.१५ वाजता पंचरत्न हौसिंग सोसायटी, फातिमा नगर वानवडी येथे एक तरुणाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळल्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता उत्कर्षने तो सध्या राहत असलेल्या एएफएमसीच्या वसतीगृहातील एका खोलीतील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळला.
उत्कर्षने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने नोट लिहिली आणि त्यामध्ये आत्महत्येचे कारण लिहिले. या नोटमध्ये बदलता अभ्यासक्रम, वर्गातील उपस्थिती (अटेंडन्स), शैक्षणिक तणाव असे कारण देत माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नका, असं सुद्धा स्पष्ट केलं आहे. तसेच या हत्याराने त्याने स्वतःचा गळा चिरला. ते हत्यार उत्कर्षने ऑनलाईन मागवलं होतं, असं देखील तपसात समोर आलं आहे.
उत्कर्ष शिंगणे याला नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० मार्क मिळाले होते. उत्कर्ष याचे वडील डॉक्टर असून भाऊ सुद्धा वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात आहे. तर आई गृहिणी आहे. भोपाळमध्ये शिक्षण घेत असलेला उत्कर्ष हा गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.