रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी पंतप्रधानांची धमकी
GH News May 08, 2025 11:07 AM

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना अत्यंत कठोर विधान केलं. भारताला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी त्यांनी दिली. “काल रात्री केलेल्या चुकीची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल”, असं शाहबाज म्हणाले. आपल्या भाषणात देशवासियांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, “आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. पाकिस्ताने भारताला काही तासांतच उत्तर देऊन मागे ढकललं आहे”, असाही दावा शरीफ यांनी केला.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे, तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पंतप्रधान शरीफ यांनी दिली. त्यांनी मृतांचा उल्लेख ‘शहीद’ असा करत संपूर्ण पाकिस्तान त्या शहिदांसोबत उभा असल्याचं म्हटलं. आपल्या भाषणात पाकिस्तानी पंतप्रधानांनी इशारा दिला, “भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. आम्ही काल रात्री सिद्ध केलं की पाकिस्तानला कडक उत्तर कसं द्यायचं हे माहीत आहे.” या भाषणाच्या अखेरीस त्यांनी पाकिस्तानी सैन्याला सलाम केला आणि सांगितलं की संपूर्ण देशाला त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अभिमान आहे.

बुधवारी सकाळी शाहबाज शरीफ यांनी संसदेत संबोधित करताना भारताच्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. “काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल क्षणाक्षणाचे अपडेट्स मला मिळत होते. काल रात्री भारताने संपूर्ण तयारीनिशी 80 फायटर जेट्ससह पाकिस्तानमधील सहा जागांवर हल्ले केले. शत्रूने अंधाऱ्या रात्री आमच्यावर हल्ला केला. परंतु अल्लाहच्या कृपेने आमचं सैन्य त्यांना चोख उत्तर देऊ शकलं. या हल्ल्यात अनेक नागरिकांसह लहान मुलांचा मृत्यू झाला. अल्लाह त्यांना स्वर्गात जागा देवो. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर भारताने घाईघाईने कारवाई केली. भारतीय माध्यमांनी पाकिस्तानवर निराधार आरोप करायला सुरुवात केली की आम्ही या हल्ल्यासाठी जबाबदार आहोत,” असं ते म्हणाले.

पहलगाम हल्ल्याबद्दल ते पुढे म्हणाले, “आम्ही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी बोललो आहोत. पहलगाम हल्ल्याची बातमी मिळाली तेव्हा मी स्वत: तुर्कीच्या दौऱ्यावर होतो. आम्ही तेव्हाच स्पष्ट केलं होतं की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत असं सांगितलं होतं. परंतु भारताने आमची मदत स्वीकारली नाही. 22 एप्रिलपासून दररोज आम्हाला हल्ला होणार असल्याची माहिती मिळत होती. परंतु आम्हाला चिथावणी दिल्यास आमचंही सैन्य चोवीस तास प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असेल.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.