नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या विविध शहरांमध्ये बुधवारी (ता. ७) युद्धसज्जतेची रंगीत तालीम (मॉक ड्रील) घेण्यात आली. युद्धकालीन परिस्थितीमध्ये नव्या आणि गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जावे लागण्याच्या तयारीचे मूल्यमापन करण्याचा उद्देश या ‘मॉक ड्रील’मध्ये होता.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारीच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना या ड्रीलविषयीच्या सूचना केल्या होत्या. दिल्ली, मुंबई, पुणे बेंगळुरू, ग्वाल्हेर, जयपूर या शहरांसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘मॉक ड्रील’ करण्यात आले. दिल्लीत महापालिका व वर्दळीच्या खान मार्केट भागात ‘मॉक ड्रील’ झाले. मुंबईमध्ये क्रॉस मैदान, तर पुण्यात कौन्सिल हॉलच्या परिसरात ही रंगीत तालीम झाली.
युद्धकालीन परिस्थितीमध्ये अचानक हल्ला झाला, तर कमीत कमी हानी व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश यामागे होता. या काळात गर्दीचे व्यवस्थापन कसे करायचे, नागरिकांना सुरक्षितस्थळी कसे न्यायचे, वीजबंदी करणे, सायरन वाजविणे यांसारख्या उपाययोजनांचा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, महत्त्वाच्या आस्थापनांची छुपी मांडणी करण्याचीही तरतूद करण्यात आली.
मुंबईतही रंगीत तालीममुंबई : मुंबई व पुण्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणांवर बुधवारी ‘मॉक ड्रील’ करण्यात आले. यामध्ये मुंबईतील क्रॉस मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. मध्य रेल्वेच्या नागरी सुरक्षा विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरात ‘मॉक ड्रील’ करण्यात आले. या पथकाकडून प्लॅटफॉर्म, प्रवेशद्वारे, थांबलेल्या रेल्वे यांसह रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यात आली. यामध्ये श्वानपथकाचाही समावेश होता.