अग्रलेख : मर्मभेदी वज्रप्रहार
esakal May 08, 2025 11:45 AM
अग्रलेख

सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर कोणीही चवताळून उठते. भारताने पाकिस्तानवर केलेला प्रत्याघात तसाच असला तरी ही कारवाई दिशाहीन नाही आणि त्याचे स्वरूप नुसतेच भावनोद्रेकाचे नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. एका जबाबदार राष्ट्राने आपल्या लोकांच्या, मातृभूमीच्या संरक्षणासाठी अतिशय विचारपूर्वक उचललेले हे पाऊल आहे. पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध व्यक्तींना ज्या निर्घृणपणे ठार मारले गेले, तो हल्ला केवळ त्या कुटुंबांवर नव्हता. त्या हल्ल्याने प्रत्येक भारतवासीय हळहळला होता. साऱ्या देशात शोकसंतापाची लाट होती. अर्थात कोणत्याही जिवंत समाजाचेच हे लक्षण म्हणावे लागेल. त्या सामूहिक संतापाला या ‘ऑपरेशन सिंदूर’ने वाट करून दिली.

पाकिस्तानात दहशतवादाच्या फॅक्टऱ्या चालविणाऱ्यांच्या डोळ्यासमोर मध्यरात्रीच्या अंधारात तारे चमकवले गेले. हे दहशतवादी तळ, त्यांचे मुख्यालय यावर आग ओकणारी क्षेपणास्त्रे केवळ त्या इमारती, आस्थापनांवर घाव घालत नव्हती, तर शांततामय सहजीवनाचे तत्त्वच मान्य नसलेल्या विकृत विचारसरणीवर प्रहार करीत होती. म्हणूनच या आखीवरेखीव आणि लक्ष्याधारित कारवाईचे महत्त्व अधिक व्यापक आहे. त्याचे दूरगामी परिणाम संभवतात. तीन युद्धे आणि कारगिल, मुंबई, उरी, पूलवामा येथील दहशतवादी हल्ले यांना वेगवेगळ्या प्रकारे भारताने प्रत्युत्तर दिले होते. पण पाकिस्तानात खोलवर आत घुसून केलेली ही कारवाई सर्वार्थाने वेगळी आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यात किती दहशतवादी ठार मारले गेले वगैरे तपशील आता येत राहतील. परंतु या तपशीलाच्या पलीकडे या कारवाईचे वेगळेपण आणि महत्त्व आहे आणि ते समजून घेतले पाहिजे. मुळात भारतद्वेषावरच पोसल्या गेलेल्या या देशाची एकारलेली वाढ त्याच्या कंगालपणातून जगासमोर आली आहे. हा देश कर्जबाजारी बनला आहे. तिथल्या मुलकी आणि संस्थात्मक रचनेला धर्मांधतेची वाळवी अक्षरशः पोखरत आहे. गरीब वर्गाच्या हलाखीला पारावार नाही, याचे कारण साधनसामग्रीचा बराचसा हिस्सा लष्कर आणि त्यांचा सरंजाम यासाठी खर्च होतो. तिथल्या साऱ्या व्यवस्थांवर लष्कराने अजगरासारखे वेटोळे घातलेले आहे. त्यात कोंडलेला जनतेचा श्वास एखाद्या धक्क्यानेच मोकळा होऊ शकतो. भारताने केलेली तडाखेबंद कारवाई हा तसा धक्का ठरू शकतो. यानिमित्ताने लोकांच्या मनात खदखदणारा असंतोष बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंजाब, सिंध, पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान ही पाकिस्तानातील राज्ये. पण पंजाबचेच वर्चस्व साऱ्या देशावर, तिथल्या संस्थां-यंत्रणांवर आहे. त्यामुळे बलुचि, सिंधी आणि पख्तुख्वातील पठाण यांच्या अस्मितांना चिरडले गेले. हीच गोष्ट पूर्व बंगालबद्दल घडली होती, तेव्हा झालेल्या उठावातूनच बांगलादेश तयार होऊनच १९७१मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. आज तोही देश भरकटत चालला आहे, ही गोष्ट वेगळी; पण तो पाकिस्तातून वेगळा झाला, हे वास्तव उरतेच. त्यामुळेच इतर प्रांतांनी उठाव केला, तर पाकिस्तान नावाचा हा कृत्रिम, द्वेषाधारित डोलारा कोसळून जाईल. तशी भीती तिथले काही अभ्यासकही व्यक्त करू लागले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या काहीच दिवस आधी त्या देशाचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताच्या विरोधात गरळ ओकताना बऱ्याच बढाया मारल्या होत्या. त्या पोकळ ठरल्याने त्यांच्यावरही पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक राग व्यक्त करीत आहेत.

दहशतवाद्यांना पोसण्याच्या धोरणाबद्दल पाकिस्तानला तडाखा देताना भारताने कुठेही नागरी जीवनाला हानी पोचणार नाही, याची काळजी घेतली. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी तळालाही लक्ष्य केलेले नाही. जगभरात झालेल्या आणि सध्याही चाललेल्या वेगवेगळ्या युद्धांत होणारा विध्वंस, अपारदर्शित्व, सर्वसामान्य नागरिकांची जीवितहानी या तुलनेत हे वेगळेपण ठसठशीतपणे समोर येते. भारताने घाव घालताना कमालीचा नेमकेपणा दाखवला. या संघर्षाची चौकट मर्यादित असायला हवी, हा त्यातला संदेश स्पष्ट आहे. तरीही पाकिस्तानने दुःसाहस केलेच तर त्याला पुन्हा जबर तडाखा देण्याची भारताची तयारी आहेच. पण त्या देशाने तसे केल्यास दहशतवादाला चिथावणीचे धोरण मान्य केल्यासारखे होईल. या अर्ध्या तासाच्या कारवाईत भारतीय लष्कराचे व्यावसायिक कौशल्य उच्च दर्जाचे असल्याचे दिसले. दहशतवादी तळांचे लक्ष्य शोधणे आणि निश्चित करणे हे आव्हान होते. यात गुप्तचर यंत्रणांची कामगिरीही स्पृहणीय आहे. त्यांच्यासह या कारवाईत सहभागी असलेल्या सर्वांचेच अभिनंदन करावे लागेल. मात्र ही मोहीम केवळ लष्करी नव्हे. राजनैतिक पातळीवर फार मोठ्या प्रमाणात भारताने पाकिस्तानच्या दहशतवादपुरस्काराच्या धोरणाचा भेसूर चेहरा जगासमोर आणण्याचे काम केले. ‘जागतिक दहशतवादविरोधी लढा’ जेवढा भारताने गांभीर्याने घेतला, तेवढा इतर कोणीच घेतला नाही.

तरीही या समस्येचे धोके लक्षात आणून देण्याचे काम भारताने सातत्याने केले. अमेरिका कोणताही दबाव आणू शकली नाही, याचे कारण ९/११ चा हल्ला हे जसे आहे, तेवढेच भारताने केलेले राजनैतिक प्रयत्नही कारणीभूत आहेत. शीतयुद्धाच्या काळात हीच अमेरिका पाकिस्तानला गोंजारत होती. भारत व पाकिस्तानला एकाच मापाने मोजत होती. आज त्या देशाच्या अध्यक्षाला भारताच्या कारवाईचे समर्थन करावे लागले. चीननेही भारत व पाकिस्तानला संयम पाळण्याचे आवाहन करण्यापलीकडे फार मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. इस्राईल, रशियाने तर उघड पाठिंबा दिला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ही पाकिस्तानात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याची स्पष्ट माहिती देणारा अर्धवार्षिक अहवाल भारताने गेल्या वर्षी मे आणि नोव्हेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेख समितीच्या बैठकीत सादर केला होता. लष्कर आणि जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटना ‘टीआरएफ’च्या माध्यमातून कार्यरत असल्याची भारताने डिसेंबर २०२३ मध्ये जाणीव करुन दिली होती. २५ एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्रांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकातून ‘टीआरएफ’चा उल्लेख वगळण्यासाठी पाकिस्तानने दबाव आणला होता. पहलगामच्या हल्लेखोरांची तसेच त्यांच्या पाठिराख्यांचीही भारताने ओळखही पटवली. त्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट पुरावेही गोळा करीत भारताने आपल्या शत्रूला जागतिक व्यासपीठावर उघडे पाडले. लष्करी कारवाईइतकीच ही राजनैतिक मोहीमही अत्यंत महत्त्वाची ठरली, हे लक्षात घ्यावे लागेल. दहशतवाद एवढ्याने संपत नसतो, याचीही जाणीव ठेवावी लागेल. त्या लढ्याचा एक ठळक भाग वैचारिक स्वरूपाचा असावा लागेल.

काश्मीरमध्ये विकासप्रक्रियेला गती देऊन भारताने पाकिस्तानच्या गैरप्रचाराला चोख उत्तर दिले होते. पाकिस्तानचा जळफळाट होत होता, तो त्यामुळेच. आता एकीकडे ते प्रयत्न सुरू ठेवून दुसरीकडे सुरक्षात्मक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. भारताच्या कारवाईला उत्तर म्हणून आणि आपली अब्रू थोडीतरी वाचावी म्हणून पाकिस्तान आगळीक करण्याची दाट शक्यता आहे. पण त्याला उत्तर देतानाही राष्ट्रीय ऐक्याची वज्रमूठ अशीच मजबूत ठेवावी लागेल. त्यातून निर्माण होणाऱ्या शक्तीकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, हा संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’ने जगाला दिला आहे. देशाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली तर काय करू शकतो, हे भारताने दाखवून दिले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.