पिंपरी, ता. ७ : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल २ लाख ६४ हजार ९८ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला असून ३१ कोटी २२ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा दंड या वाहन चालकांना आकारला आहे.
सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी दामटणे, दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणे, सीट बेल्टशिवाय वाहन चालविणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारणी केली जात आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासह अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, तरीही, काही बेशिस्त वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवितात. यामुळे रस्ते अपघात होतात. स्वतः इतरांच्याही जिवाला धोका निर्माण करतात. तसेच वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली.
---------
वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण कमी होते. त्यासाठी सर्वांनी वाहतूक नियम पाळणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जात असून दंडही वसूल केला जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू होणार आहे.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड.
विभागनिहाय कारवाई आणि दंड (रुपयांत)
वाहतूक विभाग कारवाई दंड
बावधन १२,६९२ १,३६,८७,२५०
भोसरी २३,६०४ ३२६८९९००
चाकण १५,९५९ २०७९८९००
चिंचवड १६,४१५ २०३३७५००
देहूरोड १७,६७० २२४७८२००
दिघी-आळंदी १९,९३१ २१८३७८५०
हिंजवडी २१,२१४ २,४५,०४,५५०
म्हाळुंगे १७,९४४ २,२७,९९,१००
निगडी २५,५८८ २,८३,३३,२००
पिंपरी १६,९५९ १,५८,८७,२५०
सांगवी २०,७४२ २,३६,६५,७००
तळेगाव ११,००३ १,६८,३४,९००
तळवडे २०,११६ २,०६,६९,२५०
वाकड २४,२६१ २,७७,४१,९५०
------------------------------------------------------------------
एकूण २,६४,०९८ ३१,२२, ६५, ५००
(कालवधी जानेवारी ते एप्रिल २०२५)