Khelo India 2025 महाराष्ट्राच्या तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद, प्राची गायकवाड, वेदांत वाघमारे यांना सुवर्णपदक
esakal May 08, 2025 01:45 PM

भागलपूर (बिहार), ता. ७ : महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील बुधवारचा दिवस गाजवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तिरंदाजी या खेळामध्ये सहा सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण नऊ पदकांवर मोहर उमटवताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाराष्ट्राने या खेळामध्ये सर्वसाधारण विजेतेपदावरही नाव कोरले. गतवर्षी चेन्नईतील स्पर्धेत महाराष्ट्र या क्रीडा प्रकारात उपविजेता ठरला होता.

महाराष्ट्राने खेलो इंडिया या मानाच्या क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदकांचा षटकार लगावला. गतवेळी तीन सुवर्णांसह सहा पदके महाराष्ट्राने जिंकली होती. महाराष्ट्राने यंदा झारखंड, हरियानाची मक्तेदारी मोडून वर्चस्व गाजवत सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कारले. महाराष्ट्राच्या उज्ज्वल ओलेकरने मुलांच्या रिकर्व्ह प्रकारात तमिळनाडूच्या स्मारा सर्वेशचा ६-२ सेटने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. मेघालयचा देवराज मोहपात्रा ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

मुलींच्या रिकर्व्ह प्रकारात शर्वरी शेंडे व वैष्णवी पवार या महाराष्ट्राच्या तिरंदाजांमध्येच अंतिम लढत रंगली. शर्वरीने ६-४ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले, तर वैष्णवी रौप्यपदकाची मानकरी ठरली. झारखंडच्या तमन्ना वर्मा हिला ब्राँझपदक मिळाले. याचबरोबर रिकर्व्ह प्रकारातील मिश्र प्रकारातही महाराष्ट्राने सोने लुटले. ज्ञानेश चेराळे व शर्वरी शेंडे या महाराष्ट्रीयन जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत हरियानाच्या दक्ष मलिक व अन्नू या जोडीचा ५-३ असा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. कोडांडपानी जथ्या व तोडीबोइना वैष्णवी ही आंध्र प्रदेशची जोडी ब्राँझपदकाची मानकरी ठरली.

महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी मुलींच्या कंपाउंड प्रकारात तीनही पदके जिंकून निर्भेळ यश मिळवले. प्रीतिका प्रदीप हिने सुवर्णपदकाच्या लढतीत आपलीच राज्य सहकारी तेजल साळवे हिच्यावर एक-एक गुणांसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात १४५-१४४ अशी बाजी मारली. तेजल रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर वैदेही जाधव हिने ब्राँझपदकाची कमाई केली.

प्राची गायकवाड, वेदांत वाघमारेचा ‘सुवर्ण’वेध

वेदांत वाघमारे आणि प्राची गायवाड या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी या खेळामध्ये ५० मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात अचूक निशाणा साधताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात ५० मीटर थ्री पोझीशन प्रकारात पदक जिंकणारा वेदांत वाघमारे हा पहिला नेमबाज ठरला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हे पदक ऐतिहासिक ठरले.

नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर महाराष्ट्रासाठी बुधवारी सोनियाचा दिवस ठरला. नेवासासारख्या (जि. अहिल्यानगर) ग्रामीण भागातील वेदांत वाघमारेने ५० मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात मुलांच्या विभागात ४५२.५ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.