भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून ७ मे रोजी गोळीबार करण्यात आला होता. यात कोणतंही नुकसान झालं नसून भारतीय हवाई दल पूर्णपणे सतर्क होते. एअर डिफेन्स सज्ज असल्यानं पाकिस्तानी हल्ले परतवून लावले. त्यानंतर ८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानकडून भारतातील शहरांवर ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र हे हल्लेही भारताने हाणून पाडल्याचं एअर मार्शल एके भारती यांनी सांगितलं.
भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बहावलपूरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. इथला दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाला. हा तळ जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होता. याच ठिकाणाहून भारताविरोधात दहशतवादी कारवाया केल्या जात होत्या. भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत या हल्ल्याचं ड्रोन फूटेज आणि सॅटेलाइट फुटेजही दाखवलं.
भारताने पाकिस्तानच्या गोळीबार आणि ड्रोन हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताकडून केवळ आणि केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं होतं. भारताने पाकिस्तानी लष्कर किंवा सरकारी संस्था, ठिकाणं यांना लक्ष्य केलं नव्हतं. तरीही पाकिस्तानकडून सीमेवर नियंत्रण रेषेच्या पलिकडे गोळीबार केला गेला. याला चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिलं. भारताने पाकिस्तानवर प्रत्युत्तरादखल नियंत्रण रेषेवर केलेल्या हल्ल्यात ४० पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या डीजीएमओंनी दिलीय.
भारताने पाकिस्तानातील काही ठिकाणांवर एअर स्ट्राइकही केला. यात पाकिस्तानच्या ३ एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केल्या. याशिवाय दोन एअरबेसचा रनवेवरही हल्ले केल्यानं यंत्रणा उद्ध्वस्त झाली अशी माहिती भारतीय लष्कराने दिलीय.
भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने शेवटी गुडघे टेकले. त्यांच्याकडूनच शस्त्रसंधीसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. भारतीय लष्कराने त्या दरम्यान स्पष्ट संदेश देत ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असं सांगितलं होतं. भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत डीजीएमओंनीही शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेच विनंती केल्याचं सांगण्यात आलं.