ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने पाच भारतीय विमानं पाडल्याचा दावा केला. आता याच दाव्यावरून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ तोंडघशी पडले आहेत. ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा असिफ यांना पाकिस्तानने भारतीय विमाने पाडल्याच्या दाव्याचे पुरावे मागितले गेले. तेव्हा त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. “हे सर्वकाही सोशल मीडियावर आहे, भारतीय सोशल मीडियावर आहे, आपल्या नाही”, असं ते म्हणाले. या विमानांचे अवशेष काश्मीरमध्ये पडले असून संपूर्ण भारतीय सोशल मीडियावर ते पहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण मंत्र्यांकडून असं उत्तर मिळाल्यानंतर “माफ करा, पण आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील कंटेटबद्दल बोलण्यास सांगितलं नाही” असं म्हणत अँकरनेही त्यांची बोलती बंद केली.
लढाऊ विमानं कशी पाडली गेली आणि त्यासाठी कोणती उपकरणं वापरली गेली याबद्दल अधिक विचारलं असता, ख्वाजा असिफ हे पाकिस्तानी सैन्याने वापरलेल्या विमानांची माहिती देऊ शकले नाहीत. इतकंच नव्हे तर पाकिस्तानने भारताचं विमान पाडण्यासाठी चिनी उपकरणांचा वापर केला का, याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “नाही, चिनी उपकरणं नाही. आमच्याकडे चिनी विमानं आहेत, JF-17 आणि JF-10. ही चिनी विमानं आहेत, पण ती आता पाकिस्तानमध्ये तयार केली जात आहेत. इस्लामाबादच्या जवळ ही विमानं तयार केली जात आहेत. जर भारत फ्रान्सकडून विमानं खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो. तर आम्ही चीन किंवा रशिया किंवा अमेरिका, ब्रिटनकडूनही विमानं खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो.”
याआधी एप्रिल महिन्यात ख्वाजा असिफ यांनी एका व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी गटांना निधी आणि पाठबळ दिला जात असल्याचं सांगून मोठी कबुली दिली होती. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते ‘स्काय न्यूज’च्या यालदा हकीम यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. “पण तुम्ही कबूल करत आहात का सर की पाकिस्तानचा या दहशतवादी संघटनांना पाठिंबा आणि प्रशिक्षण देण्याचा, निधी देण्याचा दीर्घ इतिहास आहे” असं त्यांनी ख्वाजा असिफ यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, “गेल्या तीन दशकांपासून आम्ही अमेरिकेसाठी आणि ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी हे घाणेरडं काम करतोय. ती एक चूक होती आणि त्यासाठी आम्हाला त्रास सहन करावा लागला आणि म्हणूनच तुम्ही मला हे सांगत आहात. जर आम्ही सोव्हिएत युनियनविरोधातील युद्धात आणि 9/11 नंतरच्या युद्धात सामील झालो नसतो, तर पाकिस्तानचा इतिहास निर्दोष, बेदाग असता.” ख्वाजा असिफ यांच्या या विधानातून हे स्पष्ट होतंय की पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून या दहशतवादी गटांना आश्रय देत आहे.
दरम्यान भारताची पाच लढाऊ विमानं पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यावर भारताच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) स्पष्ट केलं की पाकिस्तान सोशल मीडियावर क्रॅश झालेल्या विमानांचे जुने फोटो शेअर करत आहे. एका व्हायरल फोटोमध्ये पाकिस्तानी सैन्याने बहावलपूरजवळ भारताचं राफेल जेट पाडल्याचा खोटा दावा केला आहे. पीआयबीने फॅक्ट चेक करत सांगितलं की प्रत्यक्षात 2021 मध्ये पंजाबमधील मोगा इथं झालेल्या मिग-21 क्रॅशचा तो फोटो आहे.