टीम इंडिया आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. बीसीसीआय या मालिकेआधी रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवणार असल्याची चर्चा सुरु होती. रोहितने या चर्चेदरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. त्यानुसार टीम इंडियाच्या एका खेळाडूवर निवृत्तीसाठी दबाव असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टमध्ये त्या खेळाडूचं नाव तर नाही. मात्र विराट कोहली किंवा रवींद्र जडेजा या दोघांपैकी कुणी नाही ना? अशी शंकाही या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण कसोटी संघात आता हे दोघेच सर्वात अनुभवी खेळाडू आहेत.
सूत्रांच्या हवाल्याने दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसाार, रोहितला त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केली जाणार नसल्याचं आधीच सांगण्यात आलं होतं. तसेच रोहित 14-15 मे दरम्यान निवृत्तीची घोषणा करणार होता. मात्र रोहितने त्याआधीच निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. तसेच रिपोर्ट्सनुसार, आता आणखी एका खेळाडूला टेस्ट रिटायरमेंटबाबत अल्टीमेटम देण्यात आला आहे.
रिपोर्ट्नुसार, त्या बड्या खेळाडूला भविष्यात संघात स्थान मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच निवृत्ती घेण्याचा निर्णय त्या खेळाडूवरच सोपवण्यात आला आहे. त्यामुळे हा खेळाडू अल्टीमेटमनंतर स्वत:हून निवृत्ती घेणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
दरम्यान टीममधील अनुभवी खेळाडूंना अल्टीमेटम का दिला जातोय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करणं आणि त्यांना अधिकाअधिक संधी उपलब्ध करुन देणं, असा प्रयत्न निवड समितीचा आहे. निवड समिती युवा खेळाडूंबाबत प्लान करत असल्याने अनुभवी खेळाडूंना अल्टीमेटम देत आहे.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या पद्धतीने अनेक घडामोडी समोर येत आहे, त्यानुसार भारतीय संघात युवासेनेचं राज्य पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर कसोटी संघाचं कर्णधारपद कुणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. टेस्ट कॅप्टन्सीसाठी शुबमन गिल याच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या दोघांचीही चर्चा आहे.