Gevrai News : घरातून बाथरूमला चालले म्हणून गेलेल्या गेवराईतील एका महिलेने कालव्यात उडी मारून संपविली जीवनयात्रा
esakal May 09, 2025 02:45 AM

गेवराई : घरातील सदस्यांना बाथरूम चालले असे म्हणून गेलेल्या गेवराईतील एका महिलेने उजव्या कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

राधा बाळकृष्ण पांचाळ(वय ३०)रा.सेलू ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.दरम्यान, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून, काल बुधवारी दिवसभर गावातील एका शेतक-याच्या शेतात उन्हाळी भुईमूग काढणी असल्याने राधा पांचाळ ही देखील शेंगा तोडणीस गेली होती.सायंकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक करून पती,सासू- सासरे आणि दोन मुलासह जेवण केले.रात्री आठ वाजता बाथरूम चालले असे म्हणून गेलेली राधा साधारण एक तास होऊन देखील घरी न आल्याने कुटुंबीयानी शोध घेतला.

त्यानंतर घरापासून काही अंतरावर गावातील बसस्थानक जवळपास कालव्यात एका महिलेचा आवाज येत असल्याने कालव्याच्या पुलावर बसलेल्या एका युवकास आढळून आल्याने त्याने आरडाओरड करताच काही जण कालव्याकडे धावत गेले.मात्र, पाण्याचे वेग जास्त असल्याने साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर राधा पांचाळ हिला एका तरुण शेतक-याने वर काढले असताना तीचा मृत्यू झाल्याचे दिसून येताच गावातील नागरिकांनी यांनी तलवाडा पोलीसांना माहीती दिली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह जातेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला.आज सकाळी बीट अमंलदार हनुमान जावळे यांनी रितसर पंचनामा केला.शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.दरम्यान, राधा पांचाळ हिने आत्महत्या कशामुळे केली याचे कारण समोर आले नाही. एवढेच नाहीतर घरात देखील काही वादविवाद नव्हते अशी माहीती कुटुंबीयांकडून सांगण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.