घाटनांदूर : पिंपरी (ता.अंबाजोगाई) येथे नगर भोजनातून २०६ ग्रामस्थास विष बाधा झाली असून काही ग्रामस्थांवर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले तर काही जणांवर अंबाजोगाई व लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी दिली.
पिंपरी येथे हनुमानाचे मंदिर असून परिसरात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून नवसाला पावत असल्याची भक्ताची भावना असल्याने अनेक भक्त नवस पूर्ण झाल्यावर नगर भोजन देतात. (ता.७) बुधवारी एका भक्ताना सायंकाळी सहा वाजता नगर भोजन आयोजित केले होते. यात महिला पुरुष बालक मिळून आठशे ग्रामस्थांनी नगर भोजनाचा आस्वाद घेतला होता. परंतु रात्री बारा वाजल्यापासून यातील काही ग्रामस्थांना मळमळ होणे अस्वस्थ वाटणे, उलट्या, संडासचा त्रास सुरू झाल्याने काही ग्रामस्थांना पहाटे चारच्या नंतर जास्त त्रास होत असल्याने सरपंच ज्ञानेश्वरी कातकडे यांनी घाटनांदूर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पाथकर यांनी रुग्णाचे लक्षणे पाहून रुग्णाची संख्या पाहून डॉक्टर विशाल माले व इतर कर्मचारी पिंपरी येथे पाठवून सोम्ये लक्षणे असणाऱ्या एकशे बाहतर विष बाधित ग्रामस्थांवर गावात प्राथमिक उपचार केले. तर जास्त त्रास होत असलेल्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात सव्वीस लातूर येथील खाजगी रुग्णालयात आठ विष बाधित रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. सर्वाची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच (ता.८) गुरुवारी सकाळी सहायक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी अच्युत सोनवणे पंचायत समिती ग्रामसविस्तार अधिकारी विवेकानंद खोडवे गावात दाखल झाले. तर जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. पी के पिंगळे यांनी स्वयंपाक गृहाची व स्वयंपाक साठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करून भातातून विष बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून विष बाधित ग्रामस्थांचे रक्ताचे व अन्नाचे नमुने प्रयोग शाळेत तपाणीस पाठवण्यात आले असून त्याचा आवाहल आल्या नंतर विष बाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होणार आहे.