इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ५८ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात होता. मात्र हा सामना १०.१ षटकानंतर थांबवण्यात आला होता.
काहीवेळातच हा सामनाही रद्द करण्याचा निर्णय झाला असून प्रेक्षकांना स्टेडियम खाली करण्यात सांगण्यात आले आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील फ्लडलाईट्स बंद झाल्या आहेत.
नुकतीच अशी माहिती समोर आली आहे की पाकिस्तानकडून जम्मूमध्ये हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे ८ ड्रोन भारताच्या एस ४०० या एअर डिफेन्स सिस्टिमनं पाडले आहेत. त्यामुळे सध्या जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये पूर्णपणे ब्लॅक आऊट करण्यात आले आहेत.
धरमशाला सीमेपासून केवळ ६० किमी अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणाने स्टेडियममधील लाईट्सही बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान फ्लडलाईट्स बंद होण्याचे कारण समालोचकांकडून तांत्रिक समस्या असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. त्यामुळे आता पंजाब किंग्स १२ सामन्यांनंतर १६ गुणावर आहेत, तर दिल्ली कॅपिटल्स १२ सामन्यांनंतर १४ गुणांवर आहेत.
प्रभसिमरनचे अर्धशतकया सामन्यापूर्वी पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे सामना साधरण तासभर उशीराने सुरू झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही आक्रमक सुरूवात केली. दोघांनीही १२२ धावांची सलामी भागीदारी केली. दोघांचीही अर्धशतके झाली होती. पण ११ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रियांश आर्य बाद झाला. त्याला टी नटराजनने बाद केले.
त्याचबरोबर नंतर लगेचच सामनाही थांबवण्यात आला. प्रियांश आर्यने ३४ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. तसेच प्रभसिमरनने सलग चौथे अर्धशतक केले. सामना थांबला तेव्हा तो २८ चेंडूत ७ चौकारांसह ५० धावांवर नाबाद राहिला.