ढिंग टांग
सकाळपासून राजेसाहेबांचे शिर दुखत होते. फोन उचलावा तर त्यातून पाकड्यांची जिरवल्याचे उद्घोष, टीव्ही लावला तर तिथेही तोच जल्लोष. दो-चौ सवंगड्यांना फोन करून बोलवावे, तर तिथेही तीच चर्चा! सारखे आपले…पाकिस्तान!!
‘‘खामोश!,’’ दोन्ही कान बंद करोन राजेसाहेब कडाडले. त्यांची गर्जना ऐकोन त्यांचा कदीम सेवक पप्याजी फर्जंद धावत आला.
‘‘चार दिवस आम्ही सुट्टीवर परदेशी गेलो तर इथं हा घोळ करोन ठेविलात?’’ राजेसाहेब भडकले होते.
‘‘छे हो, काहीच केलं नाही जी! आत्तासुध्दा टीव्हीवर ‘सिंदूर ऑपरेशन’ बघत होतो..,’’ भोळसटपणाने पप्याजीने तपशील पुरवला. सिंदूर हा शब्द क्षेपणास्त्रासारखा राजेसाहेबांच्या कर्णसंपुटात घुसला आणि भडका आणखीनच उडाला.
‘‘खामोश, एकदम खामोश! आल्यापासून हेच ऐकतोय! चार दहशतवाद्यांनी इकडे येऊन माणसं मारली तर युद्ध करतात का? नॉन्सेन्स!!,’’ राजेसाहेब म्हणाले.
पप्याजीला ‘हो’ असं म्हणायचे होते, पण त्याने इमानदारीत ‘नाही’ अशी मान हलविली. एकंदरीत पप्याजी फर्जंदास पुढील काही मिनिटात जे ज्ञान झाले ते असे : साधे दहशतवादी तुम्हाला पकडता येत नाहीत? याला काय म्हणावे? त्या दहशतवाद्यांनी काश्मिरात जे काही केले, ते निंदनीय होते, पण त्याचे उत्तर म्हणजे युद्ध असू शकत नाही. पाकिस्तानचा काय संबंध? तो देश आधीच बरबाद झालेला असताना त्यावर आणखी क्षेपणास्त्रे डागून काय साधणार? मेलेल्याला मारण्यात काय हशील आहे?..’’
‘‘म्हणजे हे सिंदूर बिंदूर काही खरं नाही का, साहेब?’’ पप्याजीने पुन्हा भोळसटासारखा सवाल केला. त्याच्याइतका निरागस जीव उभ्या पृथ्वीतलावर आढळणार नाही!
‘‘अमेरिकेनं केलं का युद्ध? हल्ला झाला की लगेच युद्ध करतात की टिपून टिपून हुडकून काढतात?,’’ राजेसाहेबांनी युक्तिवाद केला.
‘‘हुडकून हुडकून टिपतात असं म्हणायचंय का तुम्हाला, साहेब?,’’ पप्याजीने पुन्हा एक भोळसटास्त्र डागले.
‘‘तेच ते! ते मोदीजी मारे परदेशदौरा अर्धवट टाकून आले! अरे, त्याची काय गरज होती? आम्ही टाकला का परदेशदौरा अर्धवट? पण आम्हाला असली नाटकं जमत नाहीत!..,’’ राजेसाहेब तुच्छतेने उद्गारले.
‘‘तेही खरंच साहेब! सुटीवर गेलेल्या माणसाला परत यावं लागणं योग्य नाही! मागल्या टायमाला मी कोकणात शिमग्याला गेल्तो तेव्हा...’’ भोळसट पप्याजीला आपले वाक्य पूर्ण करता आले नाही. कारण तेवढ्यात राजेसाहेबांनी हातात काहीतरी जडशीळ उचललेले त्याने चाणाक्षपणे हेरले व तो खांबाआड दडला...
‘‘दौरा अर्धवट टाकून मोदीजींनी केलं काय? तर बिहारमध्ये प्रचाराला जा, मुंबईत येऊन वेव्हजमध्ये काहीतरी बोल, असले प्रकार केले, उद्या गाणीबजावणी कराल! हीच का तुमची राष्ट्रभक्ती..आँ?, राजेसाहेबांचा संताप वाढत चालला होता.
‘‘साहेब, तुम्ही सायरन वाजल्यावर मॉक ड्रिलसाठी रस्त्यावर उतरणार आहात का?’’ पप्याजीकडे भोळसटास्त्रांचा मुबलक साठा असावा!!
‘‘कुठे वाजला सायरन? कुठे वाजला,’’ दचकून साहेबांनी विचारले.
‘‘वाजला नाही, पण वाजेल! सध्या मॉक ड्रिल चालू आहेत, देशभर! नागरिकांना युद्धाची तालीम देणं चाललंय!,’’ पप्याजीने सकाळीच व्हाटसॅपवर आलेली गोपनीय माहिती पुरवली.
‘‘डोंबलाचं तुमचं मॉक ड्रिल! यापेक्षा ते अतिरेकी पकडा ना!,’’ राजेसाहेबांनी कपाळाला हात लावून म्हटले. मॉक ड्रिल म्हटले की त्यांना हसूच येते. मागल्या वेळेलाही कोरोनाकाळात हे वेडे लोक मास्कबिस्क लावून हिंडत होते. काय म्हणायचे या पेद्रटांना?
‘‘खरंय साहेब, यापेक्षा उरलेले टोलनाके जमीनदोस्त करायला हवेत... हो की नाही?’’ पप्याजी मान डोलावत भक्तिभावाने म्हणाला.
राजेसाहेब खुदकन हसून म्हणाले, ‘‘ये हुई कुछ काम की बात!’’