२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे शेजारील देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या छंब आणि सियालकोट सेक्टरमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या दोन्ही ठिकाणच्या लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानचा छांब सेक्टर जम्मूच्या अखनूर सेक्टरच्या विरुद्ध आहे आणि नियंत्रण रेषेवर आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचा सियालकोट सेक्टर देखील अखनूर सेक्टरला लागून आहे आणि तो आंतरराष्ट्रीय सीमेवर येतो. गुरुवारी (८ मे २०२५) रात्री उशिरा पेशावरमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाल्याची नोंद झाली. तर सीमेपलीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर भारताने पाकिस्तानवर मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला.
यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. संकटात सापडलेल्या पाकिस्तानाच्या मदतीसाठी तुर्की आलं आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर तुर्कीचे एक मालवाहू विमान उतरले आहे. जम्मूमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर या मालवाहू विमानात तुर्की ड्रोन आणि काही क्षेपणास्त्रे असू शकतात. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास कराची विमानतळावर एक तुर्की मालवाहू विमान उतरले. हे विमान व्हिएतनामहून उड्डाण करत होते. पाकिस्तान आणि तुर्की दोघेही या विमानाची माहिती गुप्त ठेवत आहेत.
जर विविध माध्यमांच्या वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, हा स्फोट पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या इस्लामाबादमधील निवासस्थानापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर झाला. भारतीय क्षेपणास्त्रांनी लाहोर, सियालकोट आणि कराचीसह पाकिस्तानमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. भारतीय लष्कराने अनेक लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांना दुजोरा दिला.
जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमधील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य केल्याचे म्हटले. याशिवाय, भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानकडून येणारी आठ क्षेपणास्त्रे पाडली. दक्षिण काश्मीरमधील खुंद्रू ऑर्डनन्स डेपोजवळही स्फोट झाल्याचे वृत्त आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही.