पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने लष्करी आघाडीवर पाकिस्तानला योग्य उत्तर दिले असताना पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. तसेच, एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची गॅस पाइपलाइन देखील उडवून देण्यात आली आहे. बलुच लेखकाने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानला दुहेरी धक्का बसला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी त्यांचे शांतता अभियान बलुचिस्तानला पाठवावे, असं मीर यार बलोच यांनी विधान केले आहे. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दावा केला आहे की त्यांनी पाकव्याप्त बलुचिस्तानमधील कीच, मास्टुंग आणि काची भागात पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या सहयोगींवर सहा वेगवेगळे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये रिमोट कंट्रोल्ड बॉम्ब आणि शस्त्रे वापरली गेली. जमरान परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानी लष्कराचा एक जवान ठार झाला. त्याच वेळी अनेक चौक्यांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यांमध्ये सैन्याला जीवित आणि मालमत्तेचे नुकसानही सहन करावे लागले.
बीएलएने लष्करी साहित्य वाहून नेणाऱ्या ट्रकवरही बॉम्बस्फोट केला आणि युफोन कंपनीच्या मोबाईल टॉवरचे नुकसान केले. संघटनेने स्थानिक लोकांना सैन्याला मदत करू नका, अन्यथा तेच जबाबदार असतील असा इशारा दिला आहे. तसेच, बीएलएने या सर्व हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. त्याला बलुच स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हटले आहे.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा पाकिस्तान भारताविरुद्ध हवाई आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये अपयशी ठरला आहे. आता तो स्वतःच्या देशात फुटीरतावादी हल्ल्यांना तोंड देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएलएने बलुचिस्तानच्या अनेक भागात पाकिस्तानी सैन्याच्या अग्रभागी असलेल्या चौक्यांना लक्ष्य करून जड शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची राजवट आधीच दबावाखाली आहे. भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. आता बलुचिस्तानमधील बीएलए हल्ल्याने पाकिस्तानी सरकारची अंतर्गत कमकुवतपणा आणखी उघडकीस आणला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब झाली आहे आणि या अंतर्गत बंडामुळे ते आणखी अस्थिर झाले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.