भारताने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांसह विविध प्रमुख भारतीय प्रतिष्ठानांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन आकाशातच नष्ट केले. यानंतर, भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली आहे आणि पाकिस्तानवर हल्ला केला आहे.
बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे पाकिस्तानी सैन्यावर अनेक हल्ले झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाला सशस्त्र लोकांनी लक्ष्य केले. क्वेटामधील जंगल बाग येथील कंबरानी रोडवरील पाकिस्तानी लष्कराच्या कॅप्टन सफर खान चेक पोस्टवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यानंतर अनेक स्फोट झाले. बाडमेरमध्ये धोक्याचा सायरन सतत वाजत आहे. इथे अधूनमधून सायरनचा आवाज ऐकू येत आहे.
जिल्ह्यात पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरातील सर्व प्रकारचे दिवे बंद आहेत. अद्यापपर्यंत बाडमेरमध्ये कुठेही हल्ल्याची बातमी नाही. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईने घाबरलेले सैन्य पूंछमध्ये जोरदार गोळीबार करत आहे. येथे सुमारे एक तासापासून जोरदार गोळीबार सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे.
बीएसएफ जम्मूने माहिती दिली की ८ मे २०२५ च्या रात्री ११ वाजता आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला. जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला. बीएसएफच्या कारवाईत सात दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १२ जैश दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पाकिस्तानच्या छंब आणि सियालकोट सेक्टरमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील लोकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचा छांब सेक्टर जम्मूच्या अखनूर सेक्टरच्या विरुद्ध आहे आणि नियंत्रण रेषेवर आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचा सियालकोट सेक्टर देखील अखनूर सेक्टरला लागून आहे आणि तो आंतरराष्ट्रीय सीमेवर येतो.