India Pakistan War: भारताने प्रत्युत्तर देताच रडायला लागलं पाकिस्तान...जगभरातील देशांकडे केली 'ही' मोठी मागणी
esakal May 09, 2025 11:45 AM

पाकिस्तानने जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थान सीमेवर मिसाइल व ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांचा भारताने यशस्वीपणे प्रतिकार केला. या दहशतवादी कारवायांमुळे संतप्त झालेल्या भारतानेही उत्तर दिले आणि लाहोर, कराचीसह अनेक पाकिस्तानी भागांवर अचूक ड्रोन हल्ले केले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली असून त्यांनी पुन्हा एकदा खोट्या प्रचाराचा आसरा घेतला आहे.

भारतावर खोटे आरोप करत पाकिस्तानची बचावाची धडपड

इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालयाकडून म्हटले आहे की, “भारताच्या माध्यमांमध्ये जे आरोप लावले जात आहेत ते निराधार, गैरजबाबदार आणि पाकिस्तानला बदनाम करण्याचा कट आहे.” पठाणकोट, जैसलमेर आणि श्रीनगरवरील हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे भारतात सांगितले जात असले, तरी हे आरोप पूर्णपणे राजकीय प्रेरित असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

“विश्वसनीय तपासाविना लावलेले आरोप धोरणात्मक चूक” – पाकिस्तान

पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार, भारताकडून वारंवार कोणतीही विश्वसनीय तपासणी न करता थेट पाकिस्तानवर आरोप करणे ही एक पूर्वनियोजित रणनीती आहे. हे संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्र अस्थिर करण्याचा आणि आक्रमकतेसाठी निमित्त मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये चुकीची माहिती पसरवून राजकीय आणि लष्करी फायद्यांचा हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भारताला संयम बाळगण्याची आंतरराष्ट्रीय विनंती

पाकिस्तानने जगभरातील देशांना आवाहन करत म्हटले आहे की, “भारताच्या या धोकादायक वर्तनाकडे गांभीर्याने पाहा आणि त्याला संयम आणि जबाबदारीचे आवाहन करा.” पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का लावणाऱ्या कोणत्याही कृतीस ते कटाक्षाने उत्तर देतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

“पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध, पण घाबरणार नाही”

सरकारने शेवटी असे नमूद केले की, “आम्ही शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहोत, परंतु कोणत्याही धमकी, खोट्या माहिती किंवा उकसवणाऱ्या कृतींना आम्ही घाबरणार नाही.” त्यांचा दावा आहे की, आक्रमणाच्या कृतींना योग्य प्रत्युत्तर देण्याचा अधिकार ते राखून ठेवतात आणि भारताने लावलेले आरोप ते पूर्णपणे फेटाळून लावतात.

भारताच्या तडाखेबंद प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली असून आता ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीची याचना करत आहेत. एकीकडे भारत आपली सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान खोट्या आरोपांच्या आड दडण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाने वस्तुस्थितीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.