नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मोहिमेद्वारे जैशे महंमदचा म्होरक्या मसूद अजहरचा लहान भाऊ आणि ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी अब्दुल रऊफ असगर याचाही खातमा झाल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.
भारताने मंगळवारी (ता.७) रात्री पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात जैशे महंमदचा म्होरक्या मसूद अजहर याचे कुटुंब मारले गेले. या हल्ल्यांत रऊफ असगर ठार झाला. तो १९९९ मधील ‘आयसी- ८१४’ विमान अपहरण आणि २००१मधील संसदेवरील हल्ल्यासह अनेक मोठ्या दहशतवादी कारवायांचा सूत्रधार होता. बहावलपूर येथील मरकज मशीद सुभानअल्ला या ‘जैशे महंमद’ च्या मुख्य तळावर भारताने केलेल्या लक्ष्याधारी हल्ल्यांत जखमी झालेल्या रऊफचा मृत्यू झाल्याला भारतीय गुप्तचर यंत्रणेने दुजोरा दिला आहे.
रऊफची ओळखअब्दुल रऊफ असगर हा मसूद अजहरचा भाऊ आहे. मसूदने पाकिस्तानात स्थापन केलेल्या ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेचे कामकाज तो पाहत असे. संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) ‘जैशे’ला दहशतवादी संघटना घोषित केलेले आहे. भारतातील अत्यंत क्रूर दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेला रऊफ असगर हा निर्दयी आणि कपटी रणनीतीकार म्हणून ओळखला जात होता.
रऊफ असगरचा मृत्यू हा केवळ भारतासाठी एक रणनैतिक यश नाही तर जागतिक दहशतवादाला मोठा धक्का
दहशतवादाला सुरुंग : ‘जैशे महंमद’च्या अत्यंत निर्दयी म्होरक्याचा शेवट
‘जैशे’ची पडझड ः संघटनेच्या नेतृत्वावर वार केल्याने कारवायांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता
इतर दहशतवादी गटांना इशारा : भारताच्या निर्णायक हल्ल्यातून सीमेपलीकडील दहशतवादाबद्दल देशाच्या
कठोर भूमिकेचे दर्शन. त्या प्रदेशात कार्यरत असलेल्या इतर दहशतवादी गटांना यातून एक मजबूत संदेश मिळाला
पाकिस्तानवर राजनैतिक दबाव ः पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी जाळी नष्ट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानवर दबाव वाढवण्याची शक्यता
भारताच्या सुरक्षेत वाढ : एका प्रमुख दहशतवादी सूत्रधाराचा खातमा केल्यानंतर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेत वाढ
‘आयसी-८१४’ अपहरण (१९९९) ः इंडियन एअरलाइन्सच्या ‘आयसी-८१४’ या विमानाच्या अपहरणाचे सर्व कट रऊफ असगर याने रचला होता. मसूद अजहरला भारतीय तुरुंगातून सोडविण्यासाठी त्याने ‘हरकत -उल- मुजाहिदीन’ आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’शी हातमिळवणी करून त्याने काठमांडूत विमान अपहरणाचा कट रचला होता. रऊफचा भाऊ इब्राहिम अतहर याचाही अपहरणकर्त्यांमध्ये समावेश होता. कटाची आखणी आणि आदेश देण्याचे काम त्याच्याकडे होते. दिल्लीहून २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूला जाणाऱ्या या विमानाचे पाच अपहरणकर्त्यांनी अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहारला नेले होते. या विमानात १७६ प्रवासी होते.
संसदेवरील हल्ला (२००१) ः भारतीय संसदेवरील हल्ल्याच्या कटात रऊफ असगरचा महत्त्वाचा सहभाग होता. भारताच्या लोकशाही संस्थेवर केलेल्या या थेट हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
नरगोटा लष्करी छावणी हल्ला (२००३) ः रऊफच्या नेतृत्वाखाली ‘जैशे’ने नरगोटा येथील भारतीय लष्कराच्या छावणीवर हल्ला केला. यात सात जवान हुतात्मा झाले.
पुलवामा हल्ला (२०१९) ः जम्मू-काश्मीरमधील पुलवामात ‘सीआरपीएफ’च्या बसवर केलेल्या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले. हा हल्ला मसूर अजहरने केला असला तरी त्यात रऊफ समन्वयक होता.
सीमेपलीकडील कारवाया ः सीमापलीकडून भारताविरोधातील दहशतवादी कारवायांचे नियोजन, प्रशिक्षण आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदार रऊफकडे होती. जैशे महंमदच्या पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी प्रशिक्षणाची आखणी तो करीत असे.
रऊफ असगर हा दक्षिण आशियातील सर्वांत धोकादायक दहशतवादी सूत्रधारांपैकी एक होता. त्याचे कट अत्यंत निर्दयी होते. अत्यंत काटेकोरपणे ते अमलात आणले गेले. त्याच्या महत्त्वाकांक्षा राक्षसी होत्या. पण ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्याचा खातमा केल्याने कोणताही दहशतवादी, कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा शेवट करणे अवघड नसते, हा धडा भारताकडून जगाला मिळाला आहे. .रऊफचा अंत हा केवळ भारताचाच नाही तर दहशतवादाच्या संकटाशी लढणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचा विजय आहे.