India-Pakistan Conflict: भारतासोबत पंगा घेणाऱ्या पाकिस्तानची आता सर्व बाजूने कोंडी होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला मदत मिळत नाही. दुसरीकडे भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केली आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा हल्ला भारताने परतवून लावत पुन्हा जोरदार प्रतीहल्ला केला आहे. त्याचवेळी बलुचिस्तानमधून पाकिस्तान सैन्याला चपराक बसली आहे. बलुच आर्मीने (बीएसए) पाकिस्तानी लष्काराच्या अनेक पोस्टवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तानी लष्कराने त्या पोस्टवरील नियंत्रण गमावले आहे. बीएसएने गॅस पाईपलाईन उडवल्याचा दावा केला आहे.
खैबर-पख्तूनख्वामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने पाकिस्तानी लष्कराविरोधात हल्ले सुरु केले आहे. टीटीपी हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक जवान मारले गेले आहेत. त्याचवेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशवादी अड्डे नष्ट केली आहेत. आता बीएलएने पाकिस्तानी लष्करावरील हल्ले वाढवले आहे. पाकिस्तानी लष्कराची तुकडीवर बीएलएने हल्ला केला. त्यात 12 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला. बीएलएशी संबंधित मीडिया ग्रुप हक्कालने यासंदर्भात व्हिडिओ जारी केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. बलोच लेखक मीर यार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. मीर यार यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करताना संयुक्त राष्ट्रसंघाकडे मान्यता देण्याची मागणी केली आहे. तसेच नवी दिल्लीत बलुचिस्तानचा दुतावास सुरु करण्याची मागणी केली आहे.
मीर यार बलोच यांनी एक्सवर लिहिले की, दहशतवादी पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. लवकरच यासंदर्भात घोषणा केली पाहिजे. आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा दावा केला आहे. आम्ही भारताला विनंती करतो की, बलुचिस्तानमध्ये आपले कार्यालय सुरु करावे. तसेच भारतात आमचा दुतावास सुरु करण्यास परवानगी द्यावी. संयुक्त राष्ट्रसंघाने बलुचिस्तान गणराज्याला मान्यता द्यावी. त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांची बैठक बोलवण्यात यावी. तसेच बलुचिस्तानला नोटा छापण्यासाठी आणि पासपोर्ट छापण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बलुचिस्तानचा भूभाग सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने शांती सेना पाठवावी, अशी मागणी मीर यांनी केले.