भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनिती आखली आहे. पाकिस्तानने काल जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरुन भारतावर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हवाई हल्ला भारताने यशस्वीरित्या परतवून लावला. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारताने जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने प्रत्युत्तर म्हणून लाहोर, इस्लामाबाद, कराची, सियालकोट, बहावलपूर, पेशावर आणि कोटली येथे कारवाई केली. भारताच्या सैन्य दलांनी काल आपली क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानने डागलेली मिसाईल्स, क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली. त्याचवेळी भारतानेही पाकिस्तानवर मिसाईल्स, ड्रोनद्वारे स्ट्राईक केला.
भारताची पाकिस्तानवर दोन्ही बाजूने हल्ला करण्याची रणनिती आहे. काल आकाशातून मिसाईल, तोफ गोळ्यांचा वर्षाव केला. आज भारताने वॉटर स्ट्राइकच्या तयारीत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. आज 9 मे रोजी सकाळी चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. रामबनमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचा एक गेट उघडण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या अडचणी यामुळे वाढू शकतात
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आहे. त्यामुळे खालच्या भागात पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. भारताने काही दिवसांपूर्वी या धरणाचे दरवाजे बंद केले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूला पाण्याचा स्तर कमालीचा घटला होता. आता मुसळधार पाऊस आणि धरण भरल्याने गेट उघडले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूला पूरस्थिती येऊ शकते. आधीच अर्थव्यवस्था खराब असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी यामुळे वाढू शकतात.